१३५ वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासाला वर्धापनदिनी पुण्यात मिळणार उजाळा; कार्यक्रमांचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 01:18 PM2020-12-22T13:18:58+5:302020-12-22T13:20:40+5:30
देशाच्या जडणघडणीतही महत्वाचे योगदान असणाऱ्या काँग्रेसला २८ डिसेंबरला १३५ वर्षे पूर्ण होत आहेत
पुणे: पक्षाच्या २८ डिसेंबरला येणाऱ्या १३५ व्या वर्धापनदिनानिमित्त शहर शाखेच्या वतीने काँग्रेसच्या १३५ वर्षांच्या इतिहासाला एका खास ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून उजाळा देण्यात येत आहे. त्याशिवाय पक्षाच्या विविध ऐतिहासिक घडोमोडींच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या तुलनेत पक्षाच्या राज्य व त्यानंतर केंद्रीय शाखेने फक्त ध्वजवंदनाचे कार्यक्रम ठेवले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीतही महत्वाचे योगदान असणाऱ्या काँग्रेसला २८ डिसेंबरला १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. शहर काँग्रेसच्या वतीने दरवर्षी हा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात येत असतो.
काँग्रेसच्या अन्य कोणत्याही शाखेकडून या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम वगैरे आयोजित केले जात नाहीत. फारपूर्वी त्यावेळच्या प्रथेप्रमाणे काँग्रेसभवनमध्ये पानसुपारीचा कार्यक्रम होत असतो. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक नागरिकही याला हजेरी लावत असत. यावर्षी शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड यांच्या प्रयत्नातून विशेष कार्यक्रम होत आहे. पक्षाच्या इतक्या वर्षांच्या इतिहासाला उजाळा देणारी एक ध्वनीचित्रफित पक्षाला मिळाली आहे.
शहर सरचिटणीस रमेश अय्यर व नगरसेवक अजित दरेकर यांनी सांगितले की, शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एका मोटारीत एलईडी बसवून या ध्वनिचित्रफितीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यात पंडित नेहरूंपासून ते सोनिया गांधी यांच्यापर्यंतच्या पक्षाध्यक्षांच्या कारकिर्दीतील विशेष घडामोडींची माहिती आहे. याशिवाय पक्षाच्या वाटचालीची छायाचित्रांमधून माहिती देणारे एक प्रदर्शन छाजेड यांच्या संग्रही आहे. त्याचे २६ डिसेंबरपासून काँग्रेसभवमध्ये आयोजन करण्यात आले आहे. अनेकविध दुर्मिळ छायाचित्रांचा यात समावेश आहे. पक्षाच्या केंद्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्याच्या उपस्थितीत वर्धापनदिन व्हावा असा प्रयत्न आहे, मात्र अद्याप कोण येईल ते नक्की झालेले नाही असे अय्यर यांनी सांगितले. पक्षाच्या शहरातील वेगवेगळ्या भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून ध्वनीचित्रफित संपुर्ण शहरात पाहिली जावी यासाठी तसे नियोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
.........
राज्य स्तरावर नागपूर येथे एका भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा विचार प्रदेश कार्यकारिणीत होता. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे त्याला काही सदस्यांनी हरकत घेतली. त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला, मात्र पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दरवर्षीप्रमाणे ध्वजवंदन व कोरोना योद्धांचा सत्कार असा कार्यक्रम होईल. मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस