बाभुळगाव : इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उजनी ९० टक्के भरले असून धरणावर अवलंबून असलेल्या बळीराजाची चिंता मिटल्याचं दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात कोरोना महामारीचं संकट, लाॅकडाऊन, अतिवृृृष्टीचे संकट यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. पूणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांची जीवनदायिनी असलेल्या उजणी धरण क्षेत्रात पाऊसही कमी झाला होता. त्यामुळं उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यास वेळ लागत होता. मात्र इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणं ९० टक्के भरले असून त्यावर अवलंबुन असणार्या शेतकर्यांची चिंता मिटली आहे.
मागील वर्षी आजच्या दिवशी धरणं पूर्ण क्षमतेनं भरले होते. तर चालू हंगामात ते ९०.५४ टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास वेळ लागत असल्यानं पूर्व भागातील शेतकर्यांना यावर्षी पाण्याच्या संकटाला सामोरे जाण्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. राज्यात सर्वदूर पाऊस सुरू असताना उजनी धरण क्षेत्रात मात्र पावसाची वाणवा असल्यानं दौंडवरून येणारा पाणी विसर्ग सध्या कमी आहे. पावसाची स्थिती अशीच राहीली तर उजनी यावर्षी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता धुसर होणार असुन शेतकर्याला मात्र आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची चिंता जाणकारातुन व्यक्त करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उजनी धरणातील पाणी साठा पुन्हा वाढू लागला आहे. असाच पाऊस राहिला तर धरणं १०० टक्के भरण्यास वेळ लागणार नाही. यामुळे पुणे जिल्हातील गावांसह सोलापूरचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.
बुधवार दिनांक २९ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंतच्या उजनी धरणात ९०.५४ टक्के इतके पाणी आहे. धरणाची पाणी पातळी ४९६.३९५ मीटर इतकी असून, उपयुक्त पाणीसाठा ४८.५० टीएमसी इतका आहे. तर उजनी धरणातील सिना - माढा बोगदा २२२ क्युसेस व दहिगाव एल आय एस फाटा ६३ क्युसेसने विसर्ग सुरू असून सध्या उजनीतून २८५ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. तर उप कॅनल व मुख्य कॅनलमधून पाणी विसर्ग सध्या बंद करण्यात आला आहे.