बाभुळगाव (पुणे) : पाणी साठवण क्षमतेने राज्यात सर्वांत मोठे असलेल्या भीमानगर (ता.माढा) येथील उजनी धरणात अवघ्या तीस दिवसांत ९७.१० टक्के पाणी साठा जमा झाला आहे. धरणात दौंड येथील नदीमार्गे येणारा पाणी विसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
उजनी धरण आणखी आठवडाभरात पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे, तर उजनी धरणात सध्या ८४.३३ टक्के पाणी साठा झाला असल्याची माहिती उजणी पाटबंधारे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी दिली. या अगोदर जुलै महिन्याच्या सुरुवातीला उजनी धरण वजा १२.७७ टक्के इतके होते. सध्या उजनी धरणात दौंडवरून सध्या ७ हजार ८६९ क्यूसेकने पाणी विसर्ग येत आहे.
८ जुलै २०२२ रोजी धरणातील मृत साठ्यापैकी वजा-१२.७७ टक्के पाणी कमी झाले होते.मागील वर्षी ऑगस्टच्या सुरुवातीला उजनी ४० टक्के भरले होते. चालू वर्षी धरण रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ८४.३३ टक्के इतके भरले आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी ४९६.१०० मीटर आहे. धरणात १०८.८४ टीएमसी इतका पाणी साठा असून, उपयुक्त पाणीसाठा हा ४५.१८ टीएमसी आहे, तर उजनी धरणातून सिना माढा बोगदा २५९ क्यूसेक, दहीगाव एलआयएस ४३ क्यूसेक व छोटा कॅनलमधून २०० क्यूसेक असा एकूण ५०२ क्यूसेकने पाणी विसर्ग सुरू असल्याची माहिती उजनी प्रशासनाने दिली.