नीरा नरसिंहपूर (पुणे) : उजणी धरणापासून अवघ्या पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या टणू गावातील मोहिते वस्तीतील एका गोठ्यात बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. दरम्यान, अंधारामुळे पोलिसांना पुढील कार्यवाही करणे अवघड जात होते. मंगळवारी पुणे शहर आणि ग्रामीणच्या बीडीडीएसच्या पथकाच्या मदतीने ती संशयास्पद वस्तू दुपारी निकामी करण्यात आली.
ही वस्तू निकामी करण्यात आली असली, तरी अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. संबंधित वस्तू या ठिकाणी कशी आली, हा नेमका बॉम्ब होता की आणखी काही, यात दारू होती का, यात कोणते पदार्थ होते, याचा तपास इंदापूर पोलिस करत आहेत.
इंदापूर तालुक्यात १२० टीएमसी क्षमतेचे उजनी धरण आहे. तसेच अगदी पाच किलोमीटर अंतरावर नीरा आणि भीमा नदीच्या तीरावर नीरा-नरसिंहपूर येथे श्रीलक्ष्मी नरसिंहाचे पुराणकाळातील मंदिरदेखील आहे. अशा ठिकाणी अशी बाॅम्बसदृश वस्तू सापडणे ही चिंतेची बाब आहे. टणूतील दत्तात्रय मोहिते यांच्या गोठ्यात बॉम्बसदृश वस्तू सापडली होती. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली. सोमवारी रात्री पुणे ग्रामीण पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक (बी.डी.डी.एस.)देखील या ठिकाणी दाखल झाले. त्या वस्तूच्या जवळ कोणीही नागरिकांनी जाऊ नये म्हणून इंदापूर पोलिसांनी रात्रभर गस्त घालत खडा पहारा दिला. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून पुन्हा याचा तपास सुरू झाला. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान पुण्यावरून आणखी एक शोधक व नाशिक पथक (बी.डी.डी.एस.) या ठिकाणी दाखल झाले.
तपासणीसाठी अवशेष प्रयोगशाळेत पाठविणार
दत्तात्रय मोहिते यांच्या शेतात बॉम्बसदृश वस्तू असल्याचा फोन पोलिस यंत्रणेला आला होता. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी येऊन वस्तू संशयास्पद असल्याने पुणे ग्रामीणच्या पथकाला बोलविले. पथकाने त्याची पाहणी केल्यानंतर ते स्फोटक असल्याचे निष्पन्न झाले. त्यास सुरक्षित स्थळी नेऊन त्याचा स्फोट घडवत ते नष्ट केले. स्फोटानंतर त्याचे जे अवशेष आहेत, ते ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती इंदापूरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.