भिगवण : उजनी धरणातून सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शंभर टक्के भरलेले धरण झपाट्याने कमी होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असल्याने तसेच पाण्याच्या होणाऱ्या अतिवापरामुळे धरणातील साठा झपाट्याने घटू लागला आहे. आजअखेर धरणात ६८.५७ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी यादिवशी धरण शंभर टक्के भरलेले असल्याची माहिती संबंधित विभागाकडून मिळाली. यंदा मात्र धरणाच्या पातळीत झपाट्याने घट होत असल्याने उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकरी वर्गासमोर येणारे पाणीसंकट तसेच विजेची होणारी कपात या समस्या भेडसावू लागल्या आहेत. यंदा पावसाने ग्रामीण भागात पाठ फिरविल्याने खरीप वाया गेला. त्यातच नदीकाठच्या उसाच्या पट्ट्यात हुमणी रोगाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकºयांचे नुकसान झाले. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. कारण सोलापूरला पाणीपुरवठा करणारा औज बंधाºयाच्या नावाखाली अनेकांची शेती सुजलाम सुफलाम होत आहे. मात्र, उजनी धरणग्रस्तांना अद्याप हक्काच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे. उजनी धरणाच्या बोगद्याला विरोध करण्याची वेळ धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आली आहे. उजनी धरणातून मराठवाड्याला पिण्याच्या पाण्यासाठी बोगद्याचे काम झाले आहे. पुढे तेथील लोकांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पाणी सोडले तर पाणीपातळीत मोठी घट होऊन धरण कोरडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उजनीच्या बोगद्याला विरोधच... नीरा, भीमा नद्यांचे जोडप्रकल्प करून त्या धरणातील पाणीसाठा उजनी धरणात सोडून नंतर उजनीतून मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्याचे नियोजन आहे. मात्र, या प्रकल्पाला धरणग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध कायम असताना काम सुरूच असल्याने संतापलेल्या शेतकरीवर्गाने आंदोलनाच्या तयारीस सुरुवात केली आहे.उजनीतून पाणी सोडण्यात आल्याने पातळी खाल्यावल्याने पाण्याखाली गेलेल्या जमिनी हळूहळू उघड्या पडू लागल्याने गाळपेर करण्यासाठी पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांची धडपड सुरु झाली आहे.
उजनी होतेय झपाट्याने रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 8:17 PM
उजनी धरणातून सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शंभर टक्के भरलेले धरण झपाट्याने कमी होऊ लागले आहे.
ठळक मुद्देआज अखेर धरणात ६८.५७ टक्के पाणीसाठा आहे. उजनीतून मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्याचे नियोजन गाळपेर करण्यासाठी पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांची धडपड सुरु