इंदापूर: उजणी धरणातील (ujani dam reservoir) सध्याची पाणीपातळी मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी जास्त आहे. सोलापूरला पिण्यासाठीच्या पाण्याचे एक आवर्तन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाले आहे. तरीही उजणी धरणात अजून ६६.९३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दोन महिने सोलापूरला पाण्याची कमतरता भासणार नसल्याची माहिती उजणी धरण पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी दिली.
धरणाचे पाणी पंढरपूर, मंगळवेढा व सोलापूरसह आजूबाजूच्या गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणले जाते. या परिसरामध्ये जवळजवळ ३० ते ४० साखर कारखाने हे उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. धरणातील सध्याची पाणीपातळी ४९५.२३० मीटर आहे. एकूण ३५.८६ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या उजनीतून सीना-माढा बोगदा २२२ क्युसेक, दहीगाव एल- आयएस ८४ क्युसेक, बोगदा १०० क्युसेक, व मुख्य कॅनाल ३०० क्युसेक असा एकूण ७०६ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे.
उजनी धरणाची पाणीसाठवण क्षमता ११७ टीएमसी इतकी आहे. चालू हंगामात उजनी धरण परिसर व भीमा खोऱ्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तर धरण परिसरात अवकाळी पावसाचे प्रमाण या वर्षी जास्त झाल्याने उजनीच्या खालच्या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची कमतरता फारच कमी भासली. त्यामुळे या वर्षी चालू हंगामात उजनीतून शेतीसाठी पाण्याच्या आवर्तनाची मागणी झाली नाही. परिणामी धरणात पाणीसाठा मुबलक शिल्लक राहिल्याने या पाण्याचा फायदा पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना जास्त होणार आहे.
उजनी धरणात मुबलक प्रमाणात उपयुक्त असलेला पाणीसाठा
२८०३२०२२-बारामती-१५