कळस : उजनीच्या जलप्रदूषणाबाबत बारा वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. प्रदूषणयुक्त पाणी थांबविण्यासाठी तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र, नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, त्यांच्याकडून कामही होत नाही. सरकारने यावरती तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, मात्र उजनीला हृदयाचा आजार झाला असताना दाताच्या डॉक्टरकडून उपचार होत असल्याचा आरोप जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी केला.
शेळगाव (ता. इंदापूर) येथील जलसाक्षरता अभियान शुभारंभप्रसंगी राजेंद्रसिंह यांनी सांगितले.
नद्या स्वच्छ झाल्या तर राज्य समृद्ध होईल, मुळा आणि मुठा या नद्यांमध्ये प्रदूषण होते, हे प्रदूषण अद्यापही कमी झालेले नाही. सरकार या दोन्ही नद्यांच्या बाजूच्या परिसराला हजारो कोटी रुपये खर्च करते. परंतु नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, पाण्याचा बेसुमार वापर व पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे महाराष्ट्रात पाणीबाणी अटळ आहे. सद्य:स्थितीवर भाष्य करताना पाण्याचा वापर वाढला आहे. मात्र जिरायती शेतीचे प्रमाणही जास्त आहे. या परिस्थितीत पावसाचा प्रत्येक थेंब जिरवला पाहिजे. पाणी योग्य पद्धतीने वापरले तरच समतोल साधला जाईल.
यशदाचे उपसंचालक मलिनाथ कल्लशेट्टी यांनी शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून जलसाक्षरता अभियान गतिमान करता येईल, अनेक योजना प्रभावीपणे राबवून चळवळ अधिक बळकट होईल असे सांगितले. सेवानिवृत्त प्रकल्प संचालक उदय देवळानकर यांनी राज्यातील ऊसशेतीमुळे पाण्याचा मोठा फटका बसत असून पाण्याची बचत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात भजनदास पवार यांनी कडबनवाडी पाणलोट क्षेत्र व ऑक्सिजन पार्कची माहिती विशद करून पाण्याचे महत्व अधोरेखित केले.
या वेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजय परिट, यशदाचे संचालक सुमित पांडे यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास यशदाचे संचालक आनंद पुसावळे, छत्रपती कारखान्याचे संचालक ॲड. लक्ष्मण शिंगाडे, शेळगाव, ग्रामपंचायतीचे सरपंच रामदास शिंगाडे, कडबनवाडीचे सरपंच दादा जाधव, ॲड. अशोक शिंगाडे उपस्थित होते
.........
उजनी जलाशयामधील पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येतील यासाठी काय करता येईल? याचा या चळवळीशी संबंध असणाऱ्या तज्ज्ञ लोकांना सोबत घेऊन काम करण्यात येईल, तालुक्यात हे अभियान गतीने राबवण्यासाठी सर्व मदत केली जाईल असे सांगितले.
-
दत्तात्रेय भरणे,
सार्वजनिक जलसंधारण राज्यमंत्री