निमगाव केतकी : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी व २२ गावांचे शेतीचे पाणी देण्याच्या मंजुरीचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता उजनीचे पाणी चांगलेच पेटले आहे. निमगाव केतकी येथे रास्ता रोको आंदोलन करून या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला. एकाने तर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
संत सावता माळी मंदिर प्रांगणात इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी उजनीतील ५ टी.एम.सी. पाणी शेतीसाठी मिळालेच पाहिजे, असे म्हणत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत काही कार्यकर्त्यांनी हातातून काडीपेटी काढून त्याला धरले.
कृती समितीच्या वतीने प्रताप पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादींच्या नेत्यांबरोबर संवाद साधण्यात येईल. त्यानंतर चर्चा करून इंदापूरच्या हक्काचे ५ टी.एम.सी. पाणी मिळविण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर देखील पाणी न मिळाल्यास सोलापूर जिल्ह्याल्या पिण्याच्या व शेती पाण्याच्या नावाखाली ऑक्टोबरनंतर जाणारे उजनीचे पाणी न्यायालयात जाऊन बंद करण्यात येईल .
राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचे ऐकून आपल्या हक्काचे मिळालेले पाणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. तो निर्णय पुन्हा होईपर्यंत तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा देण्यात आला.
इंदापूर तालुक्यातील रहिवासी आणि मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांनी इंदापूरच्या बाजूने उजनीच्या पाण्याबाबत पाठिंबा दिला नाही. उलट सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांबरोबर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटण्यास जाऊन इंदापूरविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे मोहोळचे आमदार यशवंत माने यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
.
—————————————