कदमवाकवस्ती : दारिद्रयरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांसाठी सरकारकडून उज्ज्वला गॅस योजना राबवली जात आहे. यात गरिबांना चुलीसमोर स्वयंपाक करायला लागू नये, यासाठी सरकारकडून गॅसजोडणी मोफत देण्यात येत आहे. परंतु, सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने मोफत मिळणारे कनेक्शनही नको असल्याचे गृहिणी सांगतात. तर, घरी असलेला सिलिंडर बाजूला करत पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यास महिलांनी पसंती दर्शवली आहे.
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. यात गेल्या वर्षापासून चारवेळा गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. आता सिलिंडर न वापरलेलाच बरा, अशी अवस्था गृहिणींची झाली आहे. विनाअनामत ही योजना असल्यामुळे अनेकांच्या घरात गॅस कनेक्शन तर आले, मात्र दरवाढीमुळे सिलिंडर भरण्यास पैसा आणायचा कोठून, हा देखील प्रश्न गरिबांसमोर आवासून उभा आहे. कोरोनामुळे हाताला काम नाही, त्यात घर चालवणे कठीण झाले आहे. दरवाढीमुळे सिलिंडर भरणे कठीण बनल्याने ग्रामीण भागातील महिला अडचणीत सापडल्या आहेत. अगोदर चारशे रुपयांत मिळणारा सिलिंडर ८६० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे गॅस बंद करून पुन्हा चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. त्यामुळे सध्या तरी सिलिंडर घराघरांमध्ये शोभेची वस्तू बनली आहे, असे अनेक गृहिणींनी सांगितले.
--
कोट
कोरोनामुळे सध्या काही काम मिळत नाही. त्यातून दिवसेंदिवस गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने गॅस वापरणे अवघड झाले आहेत. त्यामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करायची गरज निर्माण झाली आहे. शासनाने लवकरात लवकर याचा विचार करावा.
पल्लवी कुंभार-गृहिणी कदमवाकवस्ती
--
माझा खानावळीचा व्यवसाय असून वाढत्या गॅस सिलिंडरच्या दरामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. मध्यम वर्गीय लोक घरी नीट चूल देखील करू शकत नाहीत व गॅस सिलिंडरचे गगनाला भिडलेले दर पाहता गॅस वापरणे पण अवघड झाले आहे. यामुळे मध्यम वर्गीय जनता मोठ्या अडचणीत पडली आहे.
तनुजा वैराग-खानावळ चालक