- सदानंद नाईकउल्हासनगर - शैक्षणिक साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने, हजारो मुले शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेतील २० टक्के मुलांनी बँकेत खाते उघडले असून इतर मुलांनी खाते उघडावे असे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.उल्हासनगर महापालिकेने सरकारी निर्णयानुसार शैक्षणिक साहित्याचा पैसा मुलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. मुलांना खाते उघडण्याचे आवाहन मागील दोन वर्षापासून महापालिका करत आहे. मात्र पालिका शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांनी खाते उघडण्यासाठी मुलांना मदत केली नाही, असा आरोप मुलांच्या पालकांकडून केला जात आहे. तसेच पालिकेतील मुले झोपडपट्टी व गरीब घरातील असल्याने बँकेत खाते उघडल्यास अनेक अडचणी येतात. मागीलवर्षी १० ते १५ टक्के मुलांनीच खाते उघडल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले होते. अखेर मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून तत्कालिन आयुक्तांना शैक्षणिक साहित्य कंत्राटदारामार्फत देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.महापालिका शाळेतील तब्बल ८० टक्के मुलांनी खाते उघडलेले नाही. त्यामुळे त्यांना शैक्षणिक साहित्य कसे मिळणार? असा प्रश्न महापालिकेच्या निर्णयामुळे निर्माण झाला आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी वेळीच मुलांना मदत केली असती तर बहुतांश विद्यार्थ्यांचे खाते उघडले गेले असते.गेल्यावर्षी प्रमाणे दसरा-दिवाळीला शैक्षणिक साहित्य देवून मुलांचे शैक्षणिक नुकसान करणार असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. ३१ मार्च रोजी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा विषय अचानक स्थायी समितीत आला होता. मग आताच मुलांच्या बँॅक खात्यात पैसे टाकण्याचा निर्णय कसा घेतला? असा प्रश्नही विचारला जात आहे. महापालिकेने कंत्राटदाराऐवजी थेट कंपनीकडून शैक्षणिक साहित्य खरेदी करून मुलांना जूनअखेर शैक्षणिक साहित्य द्यावे, अशी मागणी होत आहे.सावळ्यागोंधळाचा फटकामहापालिका शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक 55 कोटीपेक्षा जास्त आहे. मंडळाच्या सावळागोंधळाने पुन्हा दुसऱ्यावर्षी मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर पालिका : शैक्षणिक साहित्य उशिरा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 4:42 AM