लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समान पाणी पुरवठा योजनेचे अंतिम उद्दिष्ट २४ तास पाणी देणे हेच असून पहिल्या टप्प्यात समान पाणी वाटपावर भर दिला जाणार आहे. जलवाहिन्या आणि मीटर बसविण्याचे काम जसजसे पुढे सरकेल तसतसे ही योजना कार्यान्वित होणार आहे. प्रायोगिक तत्वावर मीटर बसविणे सुरु असून त्याचे बिल तुर्तास येणार नसल्याचे स्पष्टीकरण पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशांनुसार, या योजनेची माहिती नागरिकांना व्हावी याकरिता लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि एल अँड टी कंपनीच्या अधिका-यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, वृषाली चौधरी, वासंती जाधव, श्रद्धा प्रभुणे, संदीप खर्डेकर, कोथरूडचे स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे, विलास मोहोळ, उप अभियंता आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींना व पालिकेच्या स्थानिक उप अभियंता यांना खोदाई करण्यापूर्वी पूर्वकल्पना देण्यात यावी. खोदाई केल्यानंतर जलवाहिनीचे आणि डांबरीकरणाचे काम तात्काळ केले जावे. मीटर बसविताना नागरिकांना योजनेची माहिती दिली जावी. तसेच खोदलेले रस्ते पुर्ववत न केल्यास दंडाची आकारणी केली जावी अशा मागण्या नागरिक व नगरसेवकांनी मांडल्या. खोदाईपूर्वी नगरसेवक व उप अभियंता पथ विभाग यांना खोदाई मार्गाचा नकाशा देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.