पिंपरी : महापालिकेने २ ते ४ वर्षांपूर्वी जाहीर केलेली बक्षीस रक्कम अखेर मंगळवारी खेळाडूंना अदा केली. रक्कम मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. मात्र, काही खेळाडूंच्या पदरी अद्याप प्रतीक्षाच आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात ‘आता तरी थांबवा आंतरराष्ट्रीय खेळाडूंची अवहेलना’ या शीर्षकाखाली ३० जूनला वृत्त प्रसिद्ध केले होते. यापूर्वीही वारंवार या विषयावर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल महापालिकेने घेतली. या मागणीसंदर्भात आंदोलनही झाले होते. सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली होती. अखेर महापालिकेच्या स्थायी समितीतर्फे काही खेळाडूंना धनादेश दिले.महापालिकेतर्फे भोसरीत सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचे एव्हरेस्टवीर सागर पालकर, आनंद बनसोडे, बालाजी माने यांच्यासह कुशल देशमुख, श्रीकांत चव्हाण, रुपाली चव्हाण, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्यासह गिर्यारोहक कै. रमेश गुळवे यांच्या पत्नी मर्यादा गुळवे यांना प्रत्येकी २ लाख ९० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच, सागरी खाडी पोहून विक्रम करणारा अमोल आढाव याला १ लाख रुपयाचे बक्षीस प्रदान करण्यात आले. आशियाई सुवर्णपदक विजेता कबड्डीपटू नितीन घुले याला ५ लाख रुपयांऐवजी केवळ २ लाख रुपयांचा धनादेश दिला गेला. या वेळी सहायक आयुक्त सुभाष माछरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अखेर बक्षीस रकमेचे खेळाडूंना वाटप
By admin | Published: August 28, 2014 4:32 AM