चंदननगर : दोन वर्षांपासून विमाननगर भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली होती. परिणामी, विमाननगरमधील सर्व रस्ते अतिक्रमणाने व्यापून टाकले होते. त्यामुळे येथे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने मंगळवारी (दि. ७) व बुधवारी (दि. ८) विमाननगरमधील अतिक्रमणे व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे वृत्त सविस्तर प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आज विमाननगरमधील सर्व अतिक्रमणे विशेष मोहिमेअंतर्गत हटविण्यात आली.यात विमाननगरमधील साकोरेनगर गवनिच्या ठिकाणची अतिक्रमणे, निको गार्डन, दत्तमंदिर चौक, कैलास सुपर मार्केट, गणपती चौक, सिम्बायोसिस चौक, स्केटिंग ट्रॅक चौक, श्रीकृष्ण हॉटेल चौक या चौकांतील व सर्व अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे अतिक्रमण निरीक्षक, १०० बिगारी, दोन जेसीबी, ५० पोलीस, १५ मालवाहतूक करणारी वाहने यांच्या साह्याने सर्व अतिक्रमणे, नामफलक हाटविण्यात आले. ही कारवाई महापालिका उपायुक्त माधव जगताप, क्षेत्रीय अधिकारी वसंत पाटील, झोन २चे अतिक्रमण निरीक्षक सुभाष ढोकले, राजेंद्र लोंढे, भीमराव शिंदे, संतोष तापकीर, कुंभार यांच्या वतीने करण्यात आली. ही कारवाई संध्याकाळी पाच वाजता सुरू करण्यात आली. विमाननगरमधील रस्त्यांनी दोन वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. यापूर्वी अतिक्रमण निरीक्षक सुभाष ढोकले यांनी दोन वर्षांपूर्वी अतिक्रमणे हाटविली होती. त्यानंतर आज प्रथमच मोठी कारवाई झाली. (प्रतिनिधी)