पुण्यात कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयातील बेड्स वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याच धर्तीवर ससूनमधील बेड्स वाढवण्याचा निर्णय प्रशासनानेे घेतला आहे. मात्र त्याला 'मार्ड'तर्फे विरोध करण्यात येत आहे.
मार्डचे काही निवासी व प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणाले, कोरोनाची शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बेड्स उपलब्ध करून देणे गरजेचे देखील आहे. ही परिस्थिती आम्हाला समजत आहे. मात्र, प्रशासनाने बेड्स वाढविण्यासोबतच पुरेसे मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, वैद्यकीय कर्मचारी वर्ग सह इतर आवश्यक सुविधांचा पुरवठा आधी करावा. त्यानंतर बेड्सची संख्या वाढवावी. प्रशासन गंभीर नसून फक्त जनतेला दाखविण्यासाठी हा निर्णय घेत आहे.
मार्डचे सचिव ज्ञानेश्वर जामकर म्हणाले, सध्या ससूनमध्ये ५५० कोरोना आणि ४५० इतर रुग्ण आहेत. मात्र, निवासी डॉक्टरांची संख्या केवळ ४५० आहे. आणखी ३०० बेड वाढविले तर किमान १०० डॉक्टरांची गरज भासणार आहे. तरच रुग्णांना चांगली सेवा देणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली आहे. त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर शनिवार (दि. १७) पासून तातडीच्या नसलेल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे. कोरोना वॉॅर्ड, कॅॅज्युलिटी, आयसीयू, लेबर रूम, सर्व प्रकारच्या तातडीच्या शस्त्रक्रिया वगळता इतर सेवा देणे बंद ठेवण्यात येणार आहे.