पुणे : नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढल्याने केशवनगर, मुंढवा परिसरात डास, कीटकांचा प्रादुर्भाव वाढून परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वारंवार तक्रारी आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी या परिसराची पाहणी केली. अधिकची यंत्रसामग्री, कुमक वापरून रविवारपर्यंत सर्व जलपर्णी काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह अधिकाऱ्यांनी केशवनगर, मुंढवा, खराडी परिसराची पाहणी केली. महापालिकेतर्फे कल्याणीनगर येथे नदीपात्रात पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी नदीपात्रात बंड उभारण्यात आला आहे. त्यामुळे अधिक पाणी साचून यंदा येथील जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, परिस्थितीची पाहणी केल्यानंतर तातडीने चारपट यंत्रसामग्री वापरून तातडीने जलपर्णी काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याशिवाय या परिसरात जलपर्णीमुळे डास व कीटकांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नदीपात्रात ड्रोनद्वारे फवारणी तसेच या परिसरातील रहिवासी भागात गाड्यांद्वारे धूर फवारणी करण्यात येणार आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.