लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बनावट औषधांची निर्मिती करून जिल्ह्यातील विक्रेत्यांना विक्री केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील उमेद फार्मा सेल्सविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उमेद फार्मा सेल्सचे भागीदार प्रभाकर नामदेव पाटील (रा. कल्याणीनगर) यांना अटक केली आहे. याबरोबरच मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनीचा चालक सुदीप सुरेशकुमार मुखर्जी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अन्न व औषध विभागाचे निरीक्षक विवेक खेडकर यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
आरोपींनी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अंजी येथे मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनी असून ती या औषधांची निर्मिती करीत असल्याचे भासविण्यात आले आहे.
मुंबईच्या अन्न व औषध प्रशासनाला कोरोनाच्या काळात तपासणीमध्ये मॅक्सरिलीफ हेल्थकेअर या कंपनीच्या नावाने कोरोना संसर्गावर उपचारात वापरली जाणारी फविपिरावीर आणि हायड्रोक्सिक्लोरोक्वीन ही औषधांची निर्मिती हिमाचल प्रदेशात केली जात असल्याचे त्यावरील लेबलवरून आढळून आले. याबाबत हिमाचल प्रदेशातील एफडीएकडे विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी आम्ही मॅक्सरिलीफ हेल्थ केअर नावाच्या कोणत्याच कंपनीला औषध निर्मितीचा परवाना दिला नसल्याचे सांगितले. त्यावरुन एफडीएच्या फिर्यादीवरुन मुंबई पोलिसांनी १ कोटी ५४ लाख रुपयांची बनावट औषध जप्त केली. तसेच त्याची निर्मिती करणाऱ्या सुदीप सुरेशकुमार मुखर्जी याला अटक केली आहे. तपासणीत या कंपनीकडून विनापरवाना ५ वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची निर्मिती केली जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार एफडीएच्या मुख्यालयातून राज्यातील सर्व कार्यालयांना याबाबतची माहिती देण्यात आली.
पुणे कार्यालयामार्फत केलेल्या तपासणीत कोरेगाव पार्क येथील एका कंपनीमार्फत या औषधांचे मार्केटिंग केले जात असल्याची माहिती मिळाली. तसेच ही औषधे उमेद फार्मा सेल्सच्या मदतीने ती पुणे व इतर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना विक्री करून फसवणूक केली जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ अधिक तपास करीत आहेत.