पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक बंदोबस्त असताना स्वारगेट एसटी बसस्थानकात एका बेवारस बॅगेने सर्वांची धांदल उडाली. तब्बल दोन तासाच्या शोधानंतर बॅगेत कोणतेही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नसून, त्यात कपडे आढळले. त्यानंतर सर्वांनी नि:श्वास सोडला.
स्वारगेट एसटी बसस्थानकाच्या आवारातील एका उंबराच्या झाडाखाली सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक बेवारस बॅग आढळून आली. ही बाब काही प्रवाशांनी पोलिसांना कळविली. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर तसेच अन्य अधिकारी तातडीने तेथे पोहाेचले. बॉम्बशोधक व नाशक पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच श्वान पथक तातडीने तेथे पोहोचले. बसस्थानकातील सीसीटीव्ही पाहिल्यावर समोरच्या बसमुळे नेमकी कोणी बॅग ठेवून गेले हे दिसून येत नव्हते. स्थानकामधील सर्वांना तेथून बाजूला काढण्यात आले. त्यानंतर श्वान पथकाने तसेच बॉम्बशोधक पथकाने तपासणी केल्यावर त्यात संशयास्पद काही नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बॅग उघडून पाहिल्यावर त्यात कपडे आढळून आले.
----------------
फोटो ओळ : स्वारगेट बसस्थानकात बेवारस बॅग आढळून आल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता.