धनकवडी / पुणे : महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाणार आहे. त्यामुळे बांधकामांवर प्रशासनाची करडी नजर पडेल, या भीतीने बिल्डर धास्तावले असून, दोन दिवसांपासून बहुतेक ांनी काम बंद ठेवले आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त पितांबर कॉम्प्लेक्स येथे मदतकार्य करताना राडारोड्याखालून रहिवाशांचे सामान मिळत असून, ते पोलीस व महसूल विभागाच्या ताब्यात ठेवले जात आहे. येथील रहिवासी आपल्या मौल्यवान वस्तू व कागदपत्रे सापडतील, या आशेने दुर्घटनास्थळी डोळे लावून बसले आहेत. चार पोकलेन व डंपरच्या साहाय्याने राडारोडा हटविण्याचे काम सुरू असल्याचे हवेली तालुक्याचे तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी सांगितले. सर्व शोध कार्य संपल्यावर या सर्व सामानाचा पंचनामा करून, ते संबंधिताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.शहराच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात गावठाण; तसेच डोंगरउतार व नाल्यावर अनधिकृत इमारतींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरूआहे. यात काही नवशिके बांधकाम व्यावसायिक तर इंच इंच जागा लढवत बांधकाम करीत आहेत. नाला तसेच डोंगरउतारावर घर बांधताना इमारतीच्या कॉलमला सर्व ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे इमारत वजन सांभाळू शकेल, असा पाया मजबूत केला जात नाही. याच कारणामुळे इमारती कोसळत असल्याचे निरीक्षण आहे. दोन दिवसांपासून महानगर पालिकेची यंत्रणा काम करीत आज (रविवारी) महसूल विभागाच्या वतीने खासगी यंत्रणेमार्फत आज चार जेसीबी व सहा डंपरव्दारे ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून, यातून येथील रहिवाशांचे साहित्य निघत आहे. तसेच, या इमारतीच्या आजूबाजूच्या इमारतीचे स्ट्रक्चरल अॉडिट केले जाणार असून, त्याचा अहवाल मागवल जाणार आहे. तसेच, त्यांच्या स्थितीविषयी पाहणी केली जाणार आहे. याठिकाणच्या रहिवाशांनी तात्पुरत्या स्वरूपात चार सदनिका ताब्यात घेतल्या आहेत. याठिकाणच्या रहिवाशांना मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘अनधिकृत’वाले बिल्डर धास्तावले
By admin | Published: November 03, 2014 4:58 AM