पुणे : सूस येथील टेकडी फोडून त्याठिकाणी बांधकाम सुरु आहे. याविषयी महापालिकेकडे वारंवार तक्रार करुन देखील काही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांनी आपण संबंधितांना नोटीस बजावल्यानंतर त्यांनी काम बंद केल्याचा दावा केला आहे.
पुण्यात टेकड्याफोडीचे प्रकार वारंवार घडताना दिसतात. पण याविरुद्ध पर्यावरणप्रेमींकडून कायम आवाज उठविले जातो. सूस परिसरातल्या एका टेकडी फोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. सूस इथे साधारण जुलै २०२० महिन्यापासुन टेकडीफोड सुरु आहे. जेसीबी मशीन तसेच इतर यंत्र वापरत ही टेकडी फोडली जाते आहे. गेले ८ महिने सातत्याने ही टेकडीफोड सुरु असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. याबाबत पुणे महापालिकेकडे वारंवार तक्रार करुन देखील महापालिका काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत 'लोकमत' शी बोलताना स्थानिक तक्रारदार नागरिक म्हणाले, ८ महिन्यांपूर्वी मी हे काम सुरु झाले.त्यावेळी आम्ही तातडीने महापालिकेकडे तक्रार केली होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस बजावली. मात्र त्यानंतरही काम सुरुच आहे. महापालिका अधिकारी मात्र आता आमच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही.
याबाबत महापालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी चंद्रकांत गायकवाड म्हणाले, तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही संबंधितांना नोटीस बजावली आणि त्यानंतर ही टेकडीफोड बंद झाली आहे”. मात्र आतापर्यंत झालेल्या कामाचे काय तसेच नागरिक अजूनही काम सुरु असल्याची तक्रार करत असतील तर पुन्हा अधिकारी किमान पाहणी तरी का करत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.