कोरेगाव मूळ - ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामाचे जाळे मोठ्या प्रमाणत वाढले आहे. अशा बांधकामांवर प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने पूर्व हवेली गावामध्ये बेकायदा इमारती, चाळी उभारल्या जात आहे. नियमांची पायमल्ली करून बांधकामे केली जात आहेत.शहरालगत असलेल्या गावामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने ग्रामीण भागाचे शहरीकरण होत आहे. याचा फायदा घेत मोठ्या गावामध्ये अनेक अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात फोफावत आहेत. चार चार मजली इमारती , मोठ मोठ्या चाळी उभारून त्या भाडे तत्त्वावर देण्याचा गोरख धंदा काही व्यावसायिकांनी उभारला असून यामध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधांना बगल देत बांधकामे केली जात असल्याचे चित्र याभागात दिसून येत आहे.शासनाच्या महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६, महाराष्ट्र महसूल संहिता १९६६ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ आदी कायद्यांनुसार बांधकामाची परवानगी घ्यावी लागते, तसेच ग्रामीण भागात गावठाण क्षेत्रातील इमारत बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत.गावठाण हद्दीतील बांधकामाच्या नियमावलीविषयी हवेली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सूचना दिलेल्या आहेत. नियमानुसार आणि ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय बांधकाम केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गावठाण हद्दी बाहेरील बांधकामाचे अधिकार हे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना विभागाची परवानगी घेतल्याशिवाय बांधकाम करता येणार नाही.- तानाजी लोखंडे, गटविकास अधिकारी, हवेली४ही परवानगी वेगवेगळ्या सरकारी खात्यांकडून देण्यात येते. एकाच ठिकाणी ही व्यवस्था नसल्यामुळे बांधकाम परवानगी घेण्याच्या फंदात फार कोणी पडत नाही. त्याचबरोबर बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असलेले मोजणी, नकाशे, अन्य कागदपत्रांची पूर्तता न करता बेकायदा इमारती उभारल्या जात आहेत. राजकीय मंडळींना हाताशी धरून अनधिकृत बांधकामाची नोंद इमारत पूर्ण होण्याआधीच केली जात आहे, तर काही ठिकाणी बांधकाम सुरू पूर्ण होण्यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नळजोडणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात वाढतेय अनधिकृत बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 2:32 AM