पुणे : शहरामध्ये गेल्या तीन-चार महिन्यांपासून दर गुरुवारी सुरु असलेली अघोषित पाणी कपात अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी बचतीसाठी ही कापत करण्यात येत असली तरी प्रत्यक्ष अपेक्षित पाणी बचत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या उलट दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवल्यामुळे प्रचंड उन्हामुळे पाणी उडून जाते. यामुळे पाईपलाईनमध्ये गॅस निर्माण होऊन नंतर दोन-तीन दिवस पाणी पुरवठ्यामध्ये अनेक अडचणी येतात. यामुळे यापुढे दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद न ठेवता अन्य काही पर्याय आहेत का याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.महापालिकेच्या सोमवार (दि.२०) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसह विरोधकांनी महापालिकेकडून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊन अघोषित पाणी कपात सुरु केली असल्याचा आरोप केला आहे. या एक दिवसांच्या क्लोजरच्या नावाखाली शहराच्या अनेक भागात तीन-चार दिवस पाणी पुरवठा होत नसल्याने सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केला.याबाबत मंगळवारी (दि.२१) रोजी महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने आयुक्त सौरभ राव यांच्यासह संबंधित सर्व अधिका-यांची बैठक घेतली. यामध्ये सध्या दररोज शहरासाठी किती पाणी उचले जाते, १३५० एमएलडी पाणी उचले तर किती दिवस पाणी पुरवठा करणे शक्य होईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. गुरुवारी एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला तरी नंतरचे दोन-तीन दिवस नागरिकांना अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत. यामुळे एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेऊन अपेक्षित कपात होत नसल्याने यापुढे गुरुवारची पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत अन्य पर्यायावर चर्चा सुरु असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.
शहरातील अघोषित पाणी कपात अखेर रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 2:03 PM
शहरामध्ये गेल्या तीन-चार महिन्यांपासून दर गुरुवारी सुरु असलेली अघोषित पाणी कपात अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठळक मुद्देमुक्ता टिळक : शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद ठेऊन उपयोग नाही