पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात झालेली वाढ व सायंकाळी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे उकड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी अंगाची लाही लाही करणारे ऊन तर रात्री घामाच्या धारा असे वातावरण सध्या शहरात तयार झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी तळेगाव ढमढेरे येथे तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पार गेला आहे. तर पुणे शहरात ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
शहरात सध्या गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये पारा ४० अंशांच्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातही पारा अनेक ठिकाणी ४२ अंश सेल्सिअस असून बुधवारी तळेगाव ढमढेरे येथे तापमान ४३.१ अंशांवर पोचले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून दुपारी रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे दिसून येत आहे.
अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त उष्ण वाऱ्यांमुळे सायंकाळी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक अस्थिरतेमुळे मेघगर्जना विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे उकाड्याचे प्रमाण वाढले असून रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण राहत असल्याने हा उकाडा असह्य होत आहे. किमान तापमानातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उकाडा कामय आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच ते सात दिवस कमाल तापमानात वाढ कायम राहून सायंकाळी उशिरा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उकाडा कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शहर परिसरातील तापमान
वडगाव शेरी ४१.६,
मगरपट्टा ४१.३
कोरेगाव पार्क ४०.९
हडपसर ४०.९
शिवाजीनगर ३९.८
पाषाण ३९.४
तळेगाव ढमढेरे ४३.१
सासवड ४१.८
राजगुरुनगर ४१.७
इंदापूर ४१.६
चिंचवड ४१.५
लवळे ४१.२
बारामती ४०.१
आंबेगाव ३९.८
नारायणगाव ३८.५