पुणे : सायबर चोरट्यांकडून वेगवेगळी कारणे सांगून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असतानाच एका ज्येष्ठ नागरिकाला वेगळाच अनुभव आला. त्याच्या खात्यातून तब्बल ३ लाख ९९ हजार रुपये त्यांच्या नकळत वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचे आढळून आले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांच्या सुनेनेच त्यांच्या न कळत हा प्रकार केल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी विश्रांतवाडीत राहणाऱ्या ५९ वर्षाच्या ज्येष्ठाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या सुनेविरोधात विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर ते २ डिसेंबर २०२० दरम्यान घडला. फिर्यादी हे घरात असताना त्यांच्या सुनेने न कळत त्यांचा मोबाईल घेतला. त्यातील युपीआय अकाऊंट ओपन करुन त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ३ लाख ९९ हजार वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर करुन फिर्यादी यांचा विश्वासघात करुन पैशांचा अपहार केला.