लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पीएमपी व्यवस्थापनाने गुरुवारी विविध आगारातील चालकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. यामध्ये भोसरी, निगडी, नेहरुनगर आगारातील चालकांचा सर्वाधिक समावेश आहे. दूर अंतरावर झालेल्या बदल्यांमुळे कामगार नाराजी व्यक्त करीत असून व्यवस्थापनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे. या प्रकारामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. शहरामध्ये पीएमपीएलचे भोसरी, निगडी आणि नेहरुनगर असे तीन आगार आहेत. या आगारांमधील चालकांची पीएमपीएमल व्यवस्थापनाने स्वारगेट, हडपसर, शेवाळवाडी, पुणे स्टेशन, कात्रज या ठिकाणी बदल्या केल्या आहेत. ही बदली थेट शहराच्या एका टोकापासून शहराच्या दुसऱ्या टोकावर करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. निगडी आगारात कार्यरत असणारे काही कामगार मावळातील कामशेत, लोणावळा या भागात वास्तव्यास आहेत. अशा कामगारांची बदली थेट हडपसर, शेवाळवाडी, स्वारगेट या आगारांमध्ये बदली केली आहे. फर्स्ट शिफ्ट असल्यास या कामगारांना आता पहाटे तीनलाच घर सोडावे लागणार आहे. तसेच सेकंड शिफ्ट असल्यास घरी पोहोचण्यासही उशीर होणार असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. दूर अंतरावर बदल्या केल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे पीएमपीएमएल व्यवस्थापनाने या बदल्या तातडीने रद्द करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. जवळच्या आगारांमध्ये बदली करण्यासह झालेली बदली रद्द करण्यासाठी काही कामगार राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडत आहेत. दूर अंतरावर बदल्या करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काही कामगारांकडून केला जात आहे. प्रशासनाने कामगारांचाही विचार करावा, अशी मागणी कामगारांकडून होत आहे. कसलीही पूर्वकल्पना न देता कामगारांची बदली करण्यात आली तसेच तातडीने हजर राहण्यासही सांगण्यात आले. यामुळे कामगारांची मोठ्याप्रमाणात धावपळ होत आहे. बदलीच्या ठिकाणी अनेक कामगार रुजू झालेले नाहीत. यामुळे चालकांची संख्याही कमी असून विविध मार्गावरील बसफेऱ्यांच्या नियोजनावरही परिणाम झाला.
बदल्यांमुळे कामगारांमध्ये अस्वस्थता
By admin | Published: May 15, 2017 6:41 AM