सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय 'काकां'मुळे लागली : अजित पवार
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 29, 2021 03:04 PM2021-01-29T15:04:17+5:302021-01-29T15:24:13+5:30
आम्ही जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून आमचे चुलते वयाच्या २७ व्या वर्षांपासून सकाळी सातला कामाला सुरवात करायचे.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सत्तेत असो वा नसो पण आपल्या धडाकेबाज काम करण्याच्या 'स्टाईल'साठी ओळखले जातात. भर कार्यक्रमात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचताना आणि ढिसाळ कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणताना ते कसलीच कसर सोडत नाही. अजित पवार यांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे भल्या पहाटेच कामाला सुरुवात करतात. कधी कधी तर ते पहाटेच नियोजित ठिकाणी पोहचलेले देखील असतात. यामुळे मात्र अधिकारी,कर्मचारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली आहे. मात्र, एवढ्या सकाळी उठून कामाला सुरुवात करण्यापाठीमागचं गुपित अजित पवार यांनी सर्वांसमक्ष जाहीर केले.
पुणे जिल्ह्यातील खेड येथील एका पेट्रोलपंपाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, आम्ही जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून आमचे चुलते वयाच्या २७ व्या वर्षांपासून सकाळी सातला कामाला सुरवात करायचे. रात्री कितीही उशिरा आले तरी सकाळी सातला काम सुरु करणार म्हणजे करणार अशी त्यांची पद्धत होती. नुकतेच त्यांनी 80 वर्ष पूर्ण केले. पण आज देखील ते सकाळी सकाळीच कामाला सुरुवात करतात. हे आपण पाहतोच आहोत. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय ही मला आजोंबामुळे नव्हे तर काकांमुळे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांमुळे लागली असे जाहीरपणे मान्य केले.
अजित पवार हे नेहमी स्वतः पहाटे लवकर उठून नियोजित कामाला सुरुवात करतात. त्यामध्ये मग भेटीगाठी, दौरे, बैठका यांसह विविध राजकीय व बिगर राजकीय कार्यक्रमांमधील उपस्थिती ही सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत असते. सकाळी लवकर उठण्याच्या सवयीवरून अजित पवारांनी आपल्या सहकाऱ्यांचे देखील वेळोवेळी कान टोचलेले सुद्धा निदर्शनास आले आहे. शुक्रवारी त्यांनी सकाळी लवकर उठण्यामागचे कारण व प्रेरणास्थान खुल्या मनाने जाहीर केले. तुमच्यावर संस्कार कसे होतात त्यावर हे अवलंबून असतं. सकाळी सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण सुद्धा प्रसन्न व स्वच्छ असतं. तसेच प्रचंड उत्साह पण असतो.
राजकारणात यायच्या अजिबात भानगडीत पडू नका; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना'कानमंत्र'
पेट्रोल भरणाऱ्यांना दिल्या 'हटके' शुभेच्छा...
धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर काम केले आहे. मात्र अफाट कष्टाने त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंत मजल मारली. आपल्याला सर्वात श्रीमंत व्हायचे नाही. मात्र पुढे आपले देखील भले होईल अशा 'हटके' शुभेच्छा यावेळी अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या...