काटेवाडी : लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात युगेंद्र पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांचे नाव पुढे येत आहे. बुधवारी काटेवाडी येथे युगेंद्र पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य करून आगामी विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या नावाच्या चर्चेवर जणू शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे.
बारामती लोकसभेनंतर बारामती विधानसभा निवडणुकीची आतापासूनच चर्चा रंगली आहे. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार हे युगेंद्र पवार यांना घेऊन आतापासूनच मैदानात उतरले आहेत. पवारांनी संपूर्ण तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र हेच मैदानात उतरणार असल्याच्या चर्चेने जोर धरला.
काटेवाडीत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, संपूर्ण बारामती आपलं घर असलं, तरीसुद्धा आपलं मूळ गाव काटेवाडी आहे. सर्वांत दबाव काटेवाडी, कन्हेरीमध्ये झाला. इथल्या अनेक स्थानिक पुढाऱ्यांकडून झाला. तुम्हाला सोपा प्रश्न आहे, की साहेब बारामतीचे नसते, तर आज बारामती अशी असती का? साहेबांमुळे बारामतीचा खरा विकास झाल्याचे यावेळी युगेंद्र पवार यांनी नमूद केले. मंत्रालयात तुम्ही काटेवाडीचे आहेत असं सांगितलं, की लगेच खुर्ची आणि मान मिळतो. आताच्या वेळी पैशांचा वापर झाला; पण ३ महिन्यांनी तुम्ही त्यांना दाखवून द्या, की १०० मतांनी आपण पुढे कसं पाहिजे.’ तुम्ही अजिबात कमी पडला नाहीत, तुम्हाला धन्यवाद म्हणतो, अशा शब्दांत युगेंद्र पवार यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत दिले.