पुणे : जंगली महाराज रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या मॉडेल पदपथाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही भागात दुचाकी वाहनांचे पार्किंग, फेरीवाले, पानटपऱ्यांचे कचऱ्याचे डबे, बाकड्यांवर मद्यपींचे लोटांगण यामुळे पदपथाची स्थिती बिघडू लागली आहे. याबाबत नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांच्या काळात जंगली महाराज रस्त्यावरील पदपथाचे विस्तारीकरण करण्यात आले. कोट्यावधी रुपये खर्चून पदपथाची रचना बदलत मॉडेल पदपथ तयार करण्यात आला. नागरिकांना फिरण्यासाठी, बसण्यासाठी मनसोक्त जागा उपलब्ध करून देण्यात आली.स्वतंत्र सायकल ट्रॅक, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, ठिकठिकाणी गार्डनिंग करण्यात आले. त्यामुळे सुरूवातीपासूनच हा पदपथ नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. त्यामुळे नागरिकांकडून या पदपथाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण त्याकडे आता काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.संपुर्ण पदपथावर ठिकठिकाणी विविध प्रकारची फुलझाडे, गवत लावण्यात आले आहे. काही भागात ही झाडे जवळपास गायब झाली आहेत. ठिबक सिंचनाच्या पाईपची दुरावस्था झाली आहे. पदपथावर ठिकठिकाणी वाहने उभी केली जातात. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे प्रमाण अधिक आहे. फेरीवाले, दुकानदारांच्या पाट्या वाढू लागल्या आहेत. फेरीवाले व पानटपऱ्यांचे कचऱ्याचे डबे पदपथावरच ठेवले जातात. पान, पानमसाला खाऊन अनेक जण त्यातच तर काही जण परिसरातील झाडांवर पिचकाऱ्या मारतात. धुम्रपानही केले जाते. त्यामुळे नागरिकांना या पदपथावरून चालताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. संभाजी उद्यानासमोर लहान मुलांसाठी ठेवण्यात आलेली काही खेळणीही तुटली आहेत. बसण्याच्या ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकला जातो. हा कचरा बागेमध्ये जात आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चुन सुसज्ज करण्यात आलेल्या पदपथाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.-----------
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून ‘मॉडेल’ पदपथाकडे होतेय दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 11:23 AM
सुरूवातीपासूनच हा पदपथ नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे.
ठळक मुद्दे कोट्यावधी रुपये खर्चून पदपथाची रचना बदलत मॉडेल पदपथ तयार संभाजी उद्यानासमोर लहान मुलांसाठी ठेवण्यात आलेली काही खेळणीही तुटलीबसण्याच्या ठिकाणी नागरिकांकडून कचरा