- हणमंत पाटील, पिंपरीवेळ दुपारी १२.४५ची. पिंपरीच्या नेहमीप्रमाणे गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिग्नलला खुद्द पोलीसच दुचाकीवर ट्रिपल सीट. समोरच कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून मात्र दुर्लक्ष. बेशिस्त चालकांना सीसीटीव्हीत पाहून घरपोच पावती देणारे वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बेशिस्त पोलिसांवर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. राज्य शासनाच्या निधीतून शहरातील विविध चौकांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. महिनाभरात वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केलेल्या २८८ चालकांना घरपोच नोटीस पाठविण्यात आली. त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई नेहमी रहदारी असलेल्या डॉ. आंबेडकर चौकात करण्यात येते. त्यामुळे वाहतूक पोलीस या चौकात रोज ठाण मांडून असतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि बेशिस्त वाहनचालकांवर येथे हमखास कारवाई करण्यात येते. याच चौकात गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने नियमांचे उल्लंघन करीत एका दुचाकीवर बसलेल्या तीन पोलिसांचे छायाचित्र टिपले. या दुचाकीचा नंबर होता एमएच १६ एक्यू ४६९५. पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडण्यासाठी असलेल्या झेब्रा क्रॉसिंगवर बेशिस्तपणे संबंधित पोलीस दुचाकीवर ट्रिपल सीट सिग्नलला थांबले होते. त्याच वेळी झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे राहून नियम पाळणाऱ्या दुचाकीचालकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ तीव्र नाराजी व्यक्त केली. वाहतुकीचे नियम व दंड केवळ सामान्यांनाच आहे. नियमांचे उल्लंघन करून बेशिस्त वाहतूक करणाऱ्या या पोलिसांवर कारवाई होणार का, संबंधित पोलिसाला घरपोच नोटीस दिली जाणार का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
बेशिस्त पोलिसांना होणार का दंड?
By admin | Published: August 28, 2015 4:24 AM