चाकण : अघोषित भारनियमनाने चाकणकर नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले असून, वीज वेळेत व नियमित देण्याची मागणी शिवसेनेचे चाकण शहरप्रमुख अॅड़ प्रीतम शिंदे यांनी केली आहे़ चाकणमध्ये वीजग्राहकांना वीजबिले वेळेत येतात, पण वीज पुरेशी व वेळेत मिळत नाही, असा आरोप प्रीतम शिंदे यांनी केला आहे़ चाकणला वीज केव्हा गायब होईल याचा थांगपत्ता नसल्याने येथील नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत़ सध्या उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी विजेची गरज आहे़ शेतीला पुरेशे पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता असताना वीज मंडळाकडून वीज गायब केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी ऐन गणेशोत्सव काळात विजेचा लपंडाव सुरू असताना वैतागलेल्या गणेशभक्तांनी व संयोजकांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड केली होती़ वाकी येथे कांदा लागवड चालू असताना वीज खंडित झाल्याने येथील शेतकर्यांनी वीज कर्मचार्यांना बेदम मारहाण केली होती़ लोकसंख्येच्या तुलनेत चाकण शहरात अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याने छोट्या-मोठ्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे़ चाकण येथे ‘वीज असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था असल्याने येथील पायाभूत सुविधा कोलमडल्या आहेत़ दळण दळण्यासाठी गेल्यावर दळण लवकर मिळेल, याची निश्चित खात्री नसल्याने अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे़ विहिरीला मुबलक पाणी असताना विजेच्या चालढकलपणाने पिकाला वेळेवर पाणी देणे जिकिरीचे झाले आहे़ वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार या भागात सुरू असल्याने सर्व सामान्यांचे हाल होऊ लागले आहेत़ वीज दुरुस्तीच्या नावाखाली होत असलेले भारनियमन थांबविण्याची गरज असताना, त्यात अद्याप बदल होत नाही़ याबद्दल येथे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे़ (वार्ताहर)
अघोषित भारनियमनाने चाकणकर त्रस्त
By admin | Published: May 15, 2014 5:19 AM