पुणे : भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्म करायला हवे. हेतूविरहित कार्य समाधान देणारे असते. महाराष्ट्राची संस्कृती मोठी असून कृष्णकांत कुदळेंसारख्या व्यक्ती प्रसिद्धीपासून दूर राहून काम करतात. समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना इतरांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरव करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे असल्याचे मत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. कृष्णकांत कुदळे फाउंडेशन यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण, शंतनूराव किर्लोस्कर, सुनील दत्त, नर्गिस दत्त पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मंगल कुदळे, डॉ. सतीश देसाई, अंकुश काकडे, मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे, रवी चौधरी आदी उपस्थित होते. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केंद्र आणि राज्य शासनाला घरचा आहेर देत, सध्या विरोधक काही बोलले तर त्यांना लगेचच ‘ईडी’च्या नोटिसा बजावल्या जातात किंवा कारागृहात टाकले जाते. त्यामुळे विरोधक एसी बसमधून बाहेरबाहेरूनच संघर्ष यात्रा करीत आहेत. सध्या शिवसेना सत्तेतही आणि विरोधातही असल्याचे ते म्हणाले.कुदळे यांचा ७४व्या वाढदिवसानिमित्त कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मामासाहेब खांडगे पतसंस्थेला यशवंतराव चव्हाण, शंतनूराव किर्लोस्कर पुरस्कार भरत फाटक यांना, सुनील दत्त पुरस्कार दिव्यांगांसाठी कार्यरत रामदास म्हात्रे यांना, तर नर्गिस दत्त पुरस्कार उदयोन्मुख गायिका अभिनेत्री प्रियांका बर्वे हिला देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. प्रा. दादा शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
हेतूविरहित कार्य समाधान देणारे
By admin | Published: May 01, 2017 3:15 AM