पुणे : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली फुटबॉलमध्ये महाराष्ट्रासह देशात वेगळे काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणून येत्या वर्षात पुणे, मुंबई व नवी मुंबई येथे विमन्स अंडर सेवेंटिन एशिया फेडरेशन फुटबॉल वर्ल्डकप आणि फिफा अंडर सेवेंटिंग फुटबॉल विमन वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे, असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी शनिवारी सांगितले.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या पुण्यात झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर भारती विद्यापीठ रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील थ्री टी एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीनचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एआयएफएफचे अध्यक्ष व खासदार प्रफुल्ल पटेल, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, राज्याचे सहकार राज्यमंत्री व भारती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, भारती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, करोनाच्या संकटात डॉक्टरांनी एखाद्या योध्याप्रमाणे मोलाची भूमिका बजावली. त्यांचे योगदान समाज कधीच विसरणार नाही. माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करुन शिक्षण क्षेत्रात खूप मोठे काम केले. विद्यापीठाने डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिनिमित्त उभारलेले वास्तुसंग्रहालय हे राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पहायला खुले करायला हवे. पटेल म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्यामुळेच भारती विद्यापीठ हा आता ग्लोबल ब्रँड बनला आहे. देशाला तरूण तडफदार आणि झोकून देऊन काम करणा-या लोकप्रतिनिधीची गरज आहे.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले,करोना काळात भारती हॉस्पिटलने संवेदनशीलतेने काम केले. त्यामुळे भारतीय सैन्याने हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा गौरव केला. येथे तब्बल 12 हजार रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले. त्याचा अभिमान वाटतो. डॉ. अस्मिता जगताप यांनी 3 टेस्ला एमआरआय मशिनमुळे रुग्णाचा वेळ वाचणार असून डॉक्टरांना अधिक सुस्पष्ट प्रतिमा प्राप्त झाल्याने रोगाचे निदान करणे सोपे होणार असल्याचे सांगितले. भारती हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी यांनी आभार मानले.