पुणे : एका कर्मयोग्याच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या कर्मयोग्याला मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. शास्त्रज्ञानी देशाला आधीपासूनच अणूसंपन्न केले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळे राजकीय नेतृत्व कच खात होते. अशावेळी अटलजींनी हा दबाव झुगारत अणूचाचणीचा धाडसी निर्णय घेतला.असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला. शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, सिद्धार्थ शिरोळे, गायिका गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, वैशाली माशेलकर, संवाद, पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, स्टार्ट अपमुळे तरुणांना, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. शेतकऱ्याला आता आपल्या शेतमालाच्या थेट विक्रीचा अधिकार मिळाला आहे. कोणत्याही आडत्याशिवाय त्यांना जगभरातील बाजारपेठ खुली झाली आहे. तरुणांनी सुरू केलेल्या स्टार्टअपमुळे हे शक्य झाले आहे. या धोरणाचे श्रेय माशेलकर सरांना जाते.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, 'राष्ट्रपुरुष आणि युगपुरुष असलेल्या अटलजींच्या नावाचा 'अटल संस्कृती गौरव' हा माझ्या आयुष्यातील सर्वोचच पुरस्कार आहे. सीएसआरला लौकिक मिळण्याचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते. परिवर्तन करताना कठीण निर्णय घ्यावे लागतात आणि त्याला राजकीय पाठिंबा लागतो. अटलजींनी केवळ पाठिंबाच नाही, तर संपूर्ण स्वातंत्र्य दिले.
मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.
-------------------
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संवाद, पुणेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी अटलजींच्या रचना सादर केल्या. अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी नृत्य सादर केले.
------मी कोल्हापूरला परत जाणार...'पुणे सगळ्यांना आपलेसे करून घेते, प्रत्येकाला इथे सेटल व्हावे असे वाटते', असा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी करताच सभागृहात हशा पिकला. त्यावर 'मी कोल्हापूरला परत जाणार आहे, माझ्या विरोधकांनाही सांगून टाका', असा टोला त्यांनी लगावला.