लोणावळा, दि. 7 - एटीएममधून पैसे काढण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकाने एटीएम सेंटरजवळ दोन अनोळखी इसमांची मदत घेतली. मात्र तिच मदत त्यांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरली आली. लोणावळ्यातील स्टेट बँकेमधून ग्रीन कॅश काऊंटरचा वापर करत या दोन भामट्यांनी तब्बल 3 लाख 40 हजारांची रोकड व एक्सिस बँकेमधून 14 हजार रुपये काढत पोबारा केला आहे. शनिवारी (5 ऑगस्ट ) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी सुशिल धनकवडे (वय 61 वर्ष) यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. धनकवडे हे 31 मे रोजी रेल्वेमधून सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांना सेवा निवृत्तीनंतर मिळालेली ग्रॅज्युटी व फंडाची रक्कम रुपये 13 लाख रुपये त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया लोणावळा शाखेत जमा केली होती. यापैकी 10 लाख रुपये त्यांनी पत्नीच्या दुसर्या खात्यावर जमा केली होती तर पेन्शनची रक्कम धरुन 3 लाख 68 हजार 439 रुपये त्यांच्या स्टेट बँकेतील खात्यात जमा होती.
शनिवारी सकाळी त्यांनी कॅनरा बँकेच्या एटीएम मधून 4 हजार रुपये काढले व स्टेट बँकेच्या एटीएम मधून 10 हजार रुपये काढण्यासाठी एटीएम मध्ये उभ्या असलेल्या दोन अनोळखी व्यक्तीची मदत घेतली. त्या व्यक्तींकडे पैसे काढण्यासाठी कार्ड व एटीएमचा पिन क्रमांक दिला. त्या व्यक्तीने धनकवडे यांना दहा हजार रुपये काढून दिले व सोबत धनकवडे यांच्या कार्ड सारखे दिसणारे दुसरेच कार्ड त्यांच्या हातात दिले. धनकवडे गेल्यानंतर काही वेळांनी त्या कार्डच्या व पिन क्रमांकाच्या सहाय्याने आरोपींनी स्टेट बँक व एक्सिस बँकेच्या एटीएम मधून तब्बल 3 लाख 54 हजार रुपयांची रोकड काढून पोबारा केला आहे. एटीएम सेंटरमधील सीसीटिव्हीच्या फुटेजमधील त्या दोन अज्ञात चोरट्यांना धनकवडे यांनी ओळखले असून त्या आधारे लोणावळा शहर पोलीस तपास करत आहेत.