पुणे : पुणे महानगर पालिकेतील आरोग्य विभागात लिपिक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने राष्ट्रीय कबड्डीपटू तरुणींना साडेचार लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
आदिती ऊर्फ विद्या दीपक साळवे (रा. खडकी बाजार) या महिलापोलिसावर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोथरुड येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना २०१८ ते १२ मे २०२१ दरम्यान घडला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी महिला पोलिस या दोघी एकमेकांच्या परिचयाचा असून, राष्ट्रीयस्तरावर खेळलेल्या कबड्डीपट्टू आहेत. तर फिर्यादी तरुणीची बहीण देखील खेळाडू आहे. आरोपी महिला पोलिस दलात भरती झाल्याचे पाहून फिर्यादी तरुणीने तिच्याकडे शासकीय नोकरीच्या बाबतीत विचारणा केली होती. त्यावेळी महिला पोलिसाने तिला महापालिकेत परिचय असून, आरोग्य विभागातील लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी तरुणी, त्यांची बहीण व अन्य एका नातेवाईक महिलेकडून साडेसात लाख रुपये २०१८मध्ये घेतले. त्यानंतर माहिती मिळाली आहे. तुम्हाला लवकरच नोकरी मिळेल असे सांगितले. खूप दिवस वाट पाहून देखील नोकरी मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी महिला पोलिसाकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी साडेसात लाखापैकी ३ लाख रुपये फिर्यादीला परत दिले. राहिलेले पैसे परत मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार अर्ज दिला होता.
संबंधित तक्रार अर्जावरून चौकशी केली असता, फसवणूक झाल्याचे समोर आले. फिर्यादी व इतर दोघांकडून महिला पोलिसाने प्रत्येकी अडीच लाख रुपये नोकरी लावण्याच्या बहाण्याने घेतले होते.