रांजणगाव सांडस (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणातून मुळा मुठा व भीमा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. शिरूर व दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
गावांचा संपर्क तुटला-
आलेगाव पागा येथील बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे दौंड व शिरूरचा संपर्क तुटलाय. तसेच श्री संतराज महाराज बेट रांजणगाव सांडस या भागातील मुळा मूठा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे श्री संत राज महाराज शेत्र व दौंड तालुका या भागाचा संपर्क तुटलेला आहे. सादलगाव येथील बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे दौंड व शिरूरचाही संपर्क तुटलेला असून पारगाव येथील बंधारा पाण्याखाली बुडालेला आहे. परंतु पारगाव येथील शिरूर व चौफुला यांना जोडणारा मुख्य पूल वाहतुकीस खुला असल्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.
शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान-
भीमा नदीला आलेल्या पुरामुळे रांजणगाव सांडस व नागरगाव फाटा यांना जोडणाऱ्या मनोरम बाबा पूल नव्याने झाल्यामुळे नागरिकांची वाहतूक वर्दळ या पुलावरून होत आहे. त्यामुळे पुलाखाली पाणी असूनही हा पूल वाहतुकीसाठी खुला आहे. या मुळा, मुठा व भीमा नदीच्या पुरामध्ये नदीकाठचे अनेक वीज ट्रान्सफॉर्मर वीज पंप शेतकरी वर्गाची पाईपलाईन मीटर बॉक्स पॅनल बॉक्स पाण्याखाली बुडाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच नदीकाठावरील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.