पुणे : ॲमेझॉन कंपनीबरोबर व्यवसाय करण्याची बतावणी करत, वर्क फ्राॅम होमची जाहिरात देऊन दोघांनी एका नागरिकाला सव्वाचार लाखांना गंडा घातला.
याप्रकरणी शिवणे येथील एका ४४ वर्षांच्या नागरिकाने उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रतन सिकंदर (रा. कृष्णानगर, आसाम) व अन्य एक बँक खातेधारक अशा दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २ मे २०२२ रोजी घडली.
फिर्यादी नोकरीच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना फेसबुकवर ॲमेझॉन कंपनीबरोबर व्यवसाय करण्याची वर्क फ्रॉम होमची जाहिरात दिसली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी रतन नावाच्या महिलेने त्यांना व्यवसाय करण्याच्या आमिषाने काही पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने ते पैसे भरले असता, त्याच्यावर त्यांना आकर्षक परतावा देण्यात आला. तेव्हा फिर्यादी यांचा त्यावर विश्वास बसला. फिर्यादींचा विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांना ४ लाख १७ हजार रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादींनी ते पैसे भरल्यानंतर त्यांना परत न परतावा देण्यात आला ना त्यांनी भरलेली रक्कम दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक बोत्रे तपास करीत आहेत.