पिंपरी : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केली. तसेच बँकांमधून ८० लाख ७२ हजार ५०२ रुपयांचे गृहकर्ज घेऊन ते बुडीत करून बँकांची देखील फसवणूक केली. याप्रकरणी १४ संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील पाच संशयितांना अटक केली. बावधन येथील हाॅटेल ला-बाली, हाॅटेल पिंगारा तसेच तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे सप्टेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
अजिंक्य जगदीश पाटील (२४, रा. सेनापती बापट रस्ता, पुणे) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३१) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वासूदत्त भारत डुबे (३४, रा. बावधन), चंद्रकांत मोरे (२८, रा. फुलंब्री, संभाजीनगर), प्रकाश बळीराम थोरात (४०, रा. बल्लूर, परभणी), कृतिका पोलावर (३२, रा. बावधन), विनोद अण्णा शिंदे (२५, रा. पिंपरी राजा, संभाजीनगर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह सीए सागर कोकाटे (माजीवाडा, ठाणे), सीए नितीन चंद्राणी (३५, कोंढवा), वसीम जिलानी शेख (३५, रा. नेरुळ), ॲड. विष्णूदास चंडेल (३२, रा. मालेवाडी, परभणी), टेक्सास कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचा प्रमुख अनिल क्षत्रिय (लोढा सुप्रमस २, वागळे इस्टेट, ठाणे), टेक्सास कंपनीचे मधुसुदन (रा. वागळे इस्टेट, ठाणे), बँकेचा प्रतिनिधी उत्तम शेळके (३५, नऱ्हे, पुणे), दीपक सखाराम जंगम (२९, रा. वाघोली, पुणे), विजय साहेबराव शिंदे (रा. पिंपरी राजा, संभाजीनगर) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वासूदत्त डुबे याने फिर्यादी अजिंक्य पाटील यांना एक कोटी रुपये गुंतवणुकीच्या बदल्यात एक महिन्यात एक कोटी ७५ हजार रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर ९० लाख रुपये देण्यास भाग पाडले. त्यातील फिर्यादी अजिंक्य यांना ५० हजार रुपये रक्कम देऊन उर्वरित ८९ लाख ५० हजार रुपये स्वत:च्या फायद्याकरीता वापरून अजिंक्य यांची फसवणूक केली.
दरम्यान संशयितांनी पूर्वनियोजित कट रचला. संशयित विनोद शिंदे, दीपक जंगम आणि विजय शिंदे यांनी अशिक्षित व अल्पशिक्षित व्यक्तींना ते उच्चशिक्षित असल्याचे दाखवले. लिस्टेट कंपनीमध्ये ते नाेकरीस असल्याचे बनावट कागदपत्रे तयारी केली. बनावट सॅलरी स्लीप बनवल्या. सॅलरी स्लीपच्या आधारावर ॲक्सीस बँकेत १६ लाख ९७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या हिंजवडी शाखेत एकूण तीन होम लोनव्दारे एकत्रित ८० लाख ७२ हजार ५०२ रुपये रक्कम मंजूर करून घेतली. तसेच होम लोन मंजूर करतेवेळी बाजारभावापेक्षा जास्त मूल्यांकन किंमत (ओव्हर व्हॅल्यूएशन) रक्कम मंजूर करवून घेतली. कर्ज खाते बुडित करून बँकांची देखील फसवणूक करत असल्याने संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक कृष्णा सपकळ तपास करीत आहेत.