- लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : आळंदी शहरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या भूमिगत सांडपाणी वाहिनीचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. संबंधित ठेकेदार वाहिनीवर टाकण्यात आलेले चेंबर बांधकाम करतानाच मातीचे आच्छादन बंद करीत आहे. परिणामी, चेंबरचे काम कच्चे राहण्याचा धोका निर्माण होऊ लागला आहे. मात्र, अशा दर्जाहीन कामांकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित ठेकेदारांवर अंकुश राहत नसल्याची तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुमारे १७ लाख रुपयांचा निधी खर्च करून आळंदी शहरातील सांडपाणी पुनर्वापर योजना व ड्रेनेजलाईनचे काम मार्गी लावले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनी आणि ड्रेनेजसाठी एकच चेंबर बसविण्यात आला आहे. वास्तविक, भविष्याचा विचार करता हे चेंबर वेगवेगळे असणे गरजेचे होते. भविष्यात जलवाहिनी फुटली, तर नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागणार आहे. सध्या मंदिर परिसरातील जलवाहिनीचे कामे पूर्ण झाले असून, जलवाहिन्यांवरील चेंबर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, चेंबर बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले जात आहे. त्यात बांधकामानंतर पाणीही मारले जात नाही. उलट त्यावर जेसीबी मशिनच्या साह्याने माती टाकून चेंबर बुजवले जात आहे. त्यामुळे चेंबरचे काम पक्के होणार की नाही? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शहरातील सुरू असलेले ड्रेनेजचे काम पुढील २५ वर्षांचा विचार करून केले जात असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सुरू असलेल्या ड्रेनेजचे पाईप सहा व्यास व आठ इंची आहेत, तर ब्रिटिशकालीन ड्रेनेजसाठी वापरण्यात येणारे पाईप बारा इंची होते. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता ब्रिटिशकालीन कामांपेक्षा सध्या वापरण्यात येणाऱ्या पाईपचा व्यास मोठा असणे गरजेचे होते. मात्र, त्याबाबत नियोजनाचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे. त्यामुळे करोडो रुपयांचा खर्च करूनही दर्जेदार कामे होत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. याबाबत येथील आळंदी विकास युवा मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करूनही कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे माजी नगरसेवक डी. डी. भोसले, संदीप नाईकरे आदींनी सांगितले.