धनीवस्ती व तुकारामनगर परिसराकरिता दोन वर्षापूर्वी २५/१५ मधून ग्रामविकास कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० लाख रुपये निधी मंजूर केला होता. परंतु, काही कारणास्तव विरोधामुळे भूमिगत गटार योजनेचे काम थांबविले होते व त्यामुळे त्या लोकवस्तीवर आरोग्याचा प्रश्न जटिल होत चालला होता. त्यामुळे तेथील योजनेचे काम मार्गी लागण्याची आवश्यकता होती.
भूमिगत गटार योजनेची अडचण लक्षात आल्यानंतर अखिल महाराष्ट्र राज्य डाळिंब संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब काटे यांनी आपल्या शेतातील उभ्या पिकातून भूमिगत गटार योजनेची चारी खांदून त्यातून सांडपाणी नेण्यासाठी योगदान दिले. गावाच्या विकासकामासाठी मोलाचे सहकार्य करून एक आदर्श निर्माण करून दिला आहे व येथून पुढेही गावासाठी काही योगदान किंवा कार्य करण्यासाठी त्यांची कायमस्वरूपी मदत राहील, असे त्यांनी सांगितले. या वेळी सरपंच विद्याधर काटे, उद्योजक प्रमोद काटे ग्रामसेवक बाळासाहेब भोईटे, धीरज घुले, श्रीकांत काटे यांसह ग्रामस्थ उपास्थित होते.