श्रीकिशन काळे
पुणे : राज्यात कुठेही भारनियमन होत नसल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला, तरी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. कृषिपंपांना पहाटे चार वाजता वीज उपलब्ध करून दिली जात असल्याने शेतकरी वैतागले आहेत.
ग्रामीण भागात तर १२ तासांहून अधिक वेळ वीजपुरवठा नसतो. विशेषत: मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात ४ ते ५ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. पुणे शहरात गुरुवारी देखभाल-दुरुस्तीसाठी काही भागातील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ बंद राहील, असे निवेदन वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. परंतु, अनेक भागांतील वीज सकाळी ७ वाजताच खंडित करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेपाचपर्यंतदेखील वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. ग्रामीण भागांत २४ तास वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी सिंगल फेज वीजवितरण व्यवस्थेचेजाळे बदलून थ्री फेज लाईनने जोडण्यात आले आहे. यासाठी कृषी वाहिन्या वेगळ्या करण्यात आल्या. १२ दिवस गावात अंधारबीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा नियमित नाही. आडस (ता. केज, जि. बीड) या गावात तर गेल्या १२ दिवसांपासून वीजच नाही. गावातील एक डीपी उडाल्यामुळे १२ दिवस विजेविना ग्रामस्थांना राहावे लागत आहे. डीपी आणायला गाडी नसल्याचे कारण सांगून ग्रामस्थांकडून प्रत्येकी ५० रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर डीपी आणला; परंतु एका दिवसातच तो उडाला.