पुणे : शहरात लॉकडाऊनच्या काळात विविध विकासकामांकरिता खोदून ठेवलेले रस्ते अद्यापही पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. पथ विभाग, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाकडून ही खोदाई करण्यात आलेली आहे. पथ विभागाकडून खोदण्यात आलेले रस्ते बऱ्यापैकी पूर्ववत करण्यात आले आहेत. मात्र, पालिका आयुक्तांनी वारंवार बैठका घेऊनही पाणीपुरवठा विभाग आणि ड्रेनेज विभागाचे काम संथ गतीने सुरू आहे. पथ विभागाकडून या विभागांना रस्ते पूर्ववत करण्याबाबत पत्रही देण्यात आले आहे.
राज्य शासनाने लेव्हल एक ते चारमध्ये अनलॉक केल्यानंतर पुणे महापालिकेनेही पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर दिलासा दिला. सर्व प्रकारचे व्यवहार दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे बाजारपेठा, खासगी कार्यालये पुन्हा सुरू झाली. नागरिकही मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. मात्र, या नागरिकांना मध्यवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या खोदाईमुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. यावरून सत्ताधारी आणि प्रशासनावर टीकाही झाली होती.
पथ विभागाने महावितरण, एमएनजीएल आणि जिओ मोबाईल कंपनी, बीएसएनएल आदी कंपन्यांना खोदाईची परवानगी दिली होती. तर पाणीपुरवठा विभागाकडून समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. यासोबतच काही ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. तसेच, ड्रेनेज विभागाकडून जुन्या मलवाहिन्या बदलून त्याठिकाणी नवीन वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम थांबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. काम थांबले असले तरी अद्याप रस्ते पूर्ववत न झाल्याने जागोजागी चिखल आणि खडी पसरलेली आहे.
====
मध्यवस्तीतील बाजीराव रस्ता, शनिपार चौक, लक्ष्मी रस्ता, आप्पा बळवंत चौक, दगडुशेठ हलवाई गणपती चौक, शिवाजी रस्ता आदी रस्त्यांवर करण्यात आलेली खोदाई कायम आहे. याठिकाणी खड्डे आणि रस्त्यावर खडी पडून आहे. त्यामुळे किरकोळ स्वरुपाचे अपघातही होत आहेत.