पुणे : कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंड्री पिसोळी गाव नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या काळेपडळ पोलीस ठाण्यात जोडू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांना दिले आहे. या वेळी भाजपचे प्रभाग अध्यक्ष दादासाहेब कड, युवा मोर्चाचे अध्यक्ष अविनाश टकले, ओबीसी सेलचे अध्यक्ष ओंकार होले, विजय टकले व ग्रामस्थ उपस्थित होते.
उंड्री पिसोळी हे गाव कोंढवा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच दोन किलोमीटरवर आहे. तर नव्याने होऊ घातलेल्या काळेपडळ पोलीस ठाण्यापासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. वाढत्या नागरीकरणामुळे येथील जनतेला लवकरात लवकर पोलीस मदत मिळण्याकरिता काळेपडळ पोलीस ठाणे अंतर्गत या गावाचा समावेश करण्यात येऊ नये. वाहतुकीच्या दृष्टीने देखील नवीन पोलीस ठाण्याची हद्द लांब पल्ल्याची आहे. या गावाचा समावेश नवीन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झाल्यास लोकांना तासन् तास रेल्वे फाटकावर थांबून पोलीस ठाण्यापर्यंत जावे लागणार आहे. यामुळे जनतेला पोलीस मदत मिळण्यास विलंब होणार आहे. तसेच जनतेचा वेळ व पैसा नाहक खर्च होणार आहे.