तन्मय ठोंबरे
पुणे : रस्त्याच्या कडेला मोठ्या आवाजात ‘महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल, केळी घ्या २० रूपये डझन’ असा आवाज ऐकू आला तर नवल नाही. ग्राहक पटकन केळी घेणारच. व्यवसाय करण्यासाठी ही शक्कल लढवून बेरोजगारीवर मात करण्याची कमाल केलीय एका तरूणाने. त्याचे नाव नामदेव माने. त्याला पहिल्या लॉकडाऊनमध्ये नोकरी गमवावी लागली. त्यामुळे बेरोजगारीचे ओझे न वाहता रस्त्यावर बसून केळी विकण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला. तो दिघी परिसरात व्यवसाय करत आहे.
काेरोनामुळे पहिल्या लॉकडाऊनमध्ये हजारो-लाखो लोकांचा रोजगार गेला. त्यामुळे काहींनी हताश होऊन जीवन संपविण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी जिद्दीने नवीन काहीतरी करून जगण्याचा प्रयत्न केला. अशीच जिद्द नामदेव माने याने दाखवली आहे. तो दिघी परिसरातील एका कंपनीत कामाला होता. परंतु, लॉकडाऊन झाले आणि त्याची नोकरी गेली. त्यामुळे आता काय करावे? असा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यातून त्याने रस्त्यावर केळी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. लॉकडाऊन काळात भाजीपाला आणि फळे विकण्यासाठी परवानगी होती. त्यामुळे त्याने केळी विकायला सुरुवात केली. परंतु, ग्राहक येत नसत. मग त्याने हातात केळी घेऊन नृत्य करून ग्राहकांना आकर्षित करणे सुरू केले. त्यामुळे त्याचा व्यवसाय होऊ लागला. पण इतर लोकांना त्याचे वागणे खटकू लागले. त्यामुळे काहींनी त्याच्याविरोधात तक्रार केली. शेवटी त्याने रस्त्याच्या बाजूला एका ठिकाणी उभे राहून व्यवसाय सुरू केला.
गळ्यात किंमतीची पाटी
नामदेवने त्याच्या आवाजात एक केळी विक्रीचे गाणे रेकॉर्ड करून रस्त्यावर लावले आहे. त्यामुळे त्याला स्वत:ला ओरडावे लागत नाही. तो संपूर्ण तोंड झाकून, गळ्यामध्ये केळीची किंमत लिहिलेली पाटी घालून डोक्यावर, हातात केळी घेतो.
''दररोज केळी विकून सुमारे चारशे रूपये मिळतात. पूर्वीच्या लॉकडाऊनने खूप शिकवले आहे, आता पुन्हा लॉकडाऊन करू नये. कारण कठीण काळात जगण्याचा अनुभव घेतला आहे असे नामदेव माने यांनी सांगितले.''