नम्रता फडणीस
पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवीन घटनेनुसार नाट्य संमेलनाध्यक्षांना वर्षभर एखादा प्रकल्प किंवा उपक्रम राबविण्यासाठी दीड लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांना या निर्णयाबाबत विंगेतच ठेवण्यात आले आहे. या तरतुदीच्या माहितीबाबत त्या अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. नाट्य संमेलनाध्यक्षांना अशी माहिती देणे सयुक्तिक वाटत नाही. ही जबाबदारी स्थानिक शाखेची आहे, असे सांगत मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षांनी माहितीचा चेंडू पुण्यातील दोन स्थानिक शाखांकडे टोलवला आहे.
नाट्य संमेलनाध्यक्षांचा कार्यकाळ हा सत्कार समारंभ आणि पुरस्कार वितरण यांमध्ये खर्च होतो. इतकी वर्षे संगीत रंगभूमीची मनापासून सेवा केल्यानंतर तरूण रंगकर्मींना मार्गदर्शन करणारी शिबिरे, कार्यशाळा घ्याव्यात, अशी माझी मनापासून इच्छा होती आणि आजही आहे. पण, तशी संधी फारशी मिळाली नसल्याची खंत नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली होती. नाट्य चळवळीला बळकटी देण्यासाठी संमेलनाध्यक्ष एखादे शिबिर, कार्यशाळा किंवा एखादा प्रोजेक्ट राबवू शकतात, अशा स्वरूपात नाट्य संमेलनाध्यक्षांना अधिकार बहाल करणारी नवीन घटना डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे. अध्यक्षांना विविध उपक्रम राबवता यावेत, यासाठी दीड लाख रुपयांची तरतूददेखील करण्यात आली. विद्यमान नाट्य संमेलनाध्यक्षांना त्याचा फायदा मिळणे अपेक्षित असताना, त्यांनाच ही माहिती देण्यात आलेली नसल्याचे समोर आले. संमेलनाध्यक्षांनी एखादा उपक्रम राबविण्यासंदर्भात परिषदेला माहिती दिल्यानंतर परिषदेकडून त्यांना विशिष्ट रक्कम दिली जाणार आहे. मात्र, नाट्य संमेलनाध्यक्षपदी विराजमान होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी कीर्ती शिलेदार या माहितीपासून अनभिज्ञच आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी हा आता दोनच महिन्यांचा उरला आहे. खरे तर नाट्य संमेलनाध्यक्षपदी सन्मानाने निवड झाल्यानंतर त्यांचा प्रथम सत्कार करण्याचा मान अखिल भारतीय नाट्य परिषदेचा आहे. तेव्हाच परिषदेने ही माहिती त्यांना देणे अपेक्षित होते; मात्र तसे घडले नाही.‘संमेलनाध्यक्षांनी शिबिर, कार्यशाळा किंवा स्पर्धा वगैरे उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी नाट्य परिषदेकडून अध्यक्षांना आर्थिक सहकार्य केले जाते, याची माहिती मध्यवर्तीच काय, पण स्थानिक शाखेकडूनही देण्यात आलेली नाही. संगीत नाटकाचे डोक्युमेंटेशन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. नाटकामध्ये एखादी भूमिका करताना काय अभ्यास केला?, संगीताचे टप्पे, यावर माझ्या मुलाखतीचे डॉक्युमेंटेशन व्हावे, असा प्रस्ताव मी दिला होता. आता कधी होईल ते पाहू. पण शिबिर, कार्यशाळा घेण्यासाठी आर्थिक तरतूद असेल तर नक्कीच पुढील दोन महिन्यांत एखादा उपक्रम घेईन.- कीर्ती शिलेदार, संमेलनाध्यक्ष,९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनठाणे येथे झालेल्या नाट्य संमेलनाच्या समारोपात, नाट्य संमेलनाध्यक्षपद हे गुळाच्या गणपतीसारखे असते. त्याला कुठलेच अधिकार नसतात. संमेलनाध्यक्षाप्रमाणेच नाट्य संमेलनाध्यक्षालाही अधिकार मिळावेत. महाराष्ट्रात एखादे शिबिर किंवा कार्यशाळा घ्यायची असेल तर रक्कम देण्यात यावी, असे म्हटले होते. याची दखल घेऊन मध्यवर्ती नाट्य परिषदेने विशिष्ट रकमेची तरतूद केली, याचे स्वागत आहे. मात्र, त्याची माहिती विद्यमान अध्यक्षांना देणे अपेक्षित आहे; अन्यथा त्यांना कोण सांगणार?- फैयाज,माजी नाट्य संमेलनाध्यक्षआॅक्टोबर महिन्यात नियामक मंडळाची बैठक झाली होती. तेव्हा कोषाध्यक्षांना विचारले होते. त्या वेळी संमेलनाध्यक्षांनी प्रपोजल द्यावे लागते, असे त्यांनी सांगितले. याची तत्काळ कल्पना कीर्तीतार्इंना दिली होती. त्यानंतरच त्यांनी वैयक्तिक डॉक्युमेंटेशनचे पत्र मध्यवर्तीकडे पाठविले. पाच महिन्यांनंतर हे कळले, की शाखांनी ही माहिती त्यांना द्यायची आहे. मध्यवर्ती नाट्य परिषदेने त्या-त्या शहरातील स्थानिक शाखांना हे सांगायला हवे, की संमेलनाध्यक्षांनी प्रपोजल दिल्यावरच त्यांना पैसे मिळणार आहेत. हे आम्ही त्यांना सांगणे अपेक्षित आहे. आम्हाला हे सांगण्यात आले नाही.- दीपक रेगे, उपाध्यक्ष,नाट्य परिषद पुणे शाखा४ या संदर्भात परिषदेचे कोषाध्यक्ष नाथा चितळे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी माहितीचा चेंडू स्थानिक शाखेकडे टोलविला. ही माहिती देणे सयुक्तिक वाटत नसल्याचे अजब स्पष्टीकरण देत त्या भागातील स्थानिक शाखेने ही माहिती नाट्य संमेलनाध्यक्षांना द्यायला हवी, असे अजब तर्कट त्यांनी मांडले. दोन महिन्यांचा कालावधी हातात असल्याने कीर्ती शिलेदार यांनी एखादा उपक्रम आयोजित केल्यास तत्काळ त्यासाठी निधी मंजूर केला जाईल, असे स्पष्टीकरण चितळे यांनी दिले.