लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या १९४७ च्या युद्धात अनेक जवानांनी शाैर्यगाथा गाजवली. त्यांच्या पराक्रमामुळे आणि हौतात्म्यामुळे या युद्धात आपल्याला विजय मिळाला. दुर्दैवाने या युद्धातील अनेक घटनांची योग्य पद्धतीने नोंद झाली नाही. येत्या काळात या महत्त्वाच्या युद्धातील नोंद न झालेल्या घटनांचा तसेच हुतात्म्यांच्या शाैर्याचे योग्य वर्णन येत्या काळात व्हावे, अशी अपेक्षा निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेश सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडिज यांच्या सयुक्त विद्यमाने १९७१ च्या युद्धाच्या राैप्य महोत्सवी वर्षानिमत्ती तसेच लष्करदिनाचे आैचित्य साधून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यात १९६२, १९६५ तसेच १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याने बजावलेल्या महत्त्वाच्या कामगिरीवर ही व्याख्यानमाला आहे. याचे पहिले पुष्प गुंफतांना हेमंत महाजन होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त परराष्ट्र अधिकारी अशोक गोखले उपस्थित होते. यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
महाजन म्हणाले, १९४७ युद्धात भारतीय जवानांनी अतुलनीय साहस दाखवले. युद्धात सहभागी झालेल्या अधिकारी आणि जवानांनी योग्य निर्णय घेतल्यामुळे जम्मू काश्मीर पाकिस्तानमध्ये जाण्यापासून आपण थांबवू शकलो. आज भारताला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर लढावे लागत आहे. पारंपरिक युद्धात पाकिस्तान भारताला हरवू शकत नसल्यामुळे हायब्रिड युद्धप्रणालीचा दोन्ही देश भारताविरुद्ध वापर करत आहे.
परराष्ट्र अधिकारी अशोक गोखले म्हणाले, जागतिक सैन्य इतिहासात १९७१चे युद्धाची सुवर्णअक्षरात नोंद आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीत दोन्ही देशादरम्यान झालेल्या तिन्ही युद्धांचे मूळ आहे. १९४७ च्या युद्धातील घटनांचे संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधन ही दीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. त्या दृष्टीने देशांच्या सैन्याचा इतिहासाचे लेखण होण्यासाठी हे संशोधन गरजेचे आहे. १९४७ च्या युद्धानंतर दोन्ही देशांचे संबंध कधी सुधारले नाही. जिन्ना यांनी ज्या हेतूने पाकिस्तान वेगळा केला तो हेतू त्यांच्या नंतर तेथील लष्कराने जपला नाही. यामुळे तेथील राजकारण हे लष्करकेंद्रीत राहिले.
निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी प्रास्ताविक केले.