नितीन शिंदे / लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेला एकूलता एक मुलगा अपघातात जखमी झाला आणि दुर्दैवाने डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातही एकूलत्या एक मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करून देणाऱ्या रुपीनगर तळवडे येथील अमित म्हस्के यांनी समाजासाठी खूप मोठा संदेश देण्याचे काम केले आहे. तेजस अमित म्हस्के (वय १९, रा. रुपीनगर) हा तरुण दि. २४ मे रोजी दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला. बिर्ला हॉस्पिटलने गुरुवारी तेजस ब्रेन डेड असल्याची कल्पना नातेवाइकांना दिली. नियतीच्या अशा गंभीर आघाताने म्हस्के कुटुंबीय ढासळून गेले. पण त्यातूनही स्वत:ला सावरत तेजसचे वडील म्हस्के यांनी सामाजिक भान जपत मृत्यूपश्चातही तेजसला अनंत जीवदान देण्यासाठी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी जागृती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तेजसचे डोळे दान करण्याचे ठरवले. तेजसचे डोळेही अशाच गरजू अंध रुग्णांना दान करण्यात येणार आहेत. आघातानंतरही सामाजिक भान जपत अनेकांना जीवनदान देण्याच्या या निर्णय म्हस्के यांनी घेतला आहे.नियतीचा आघात कायमचा अमित म्हस्के यांना तेजस आणि तनिष्का ही दोन अपत्ये. नियतीने कायमच या कुटुंबावर आघात केला आहे कारण तनिष्का म्हस्के (वय १५) ही जन्मापासून दृष्टिहीन असून ती मुलींच्या कोथरूड येथील अंधशाळेत दहावीत शिकते. तनिष्काच्या अंधत्वानंतरही समाजासाठी आपण काही देणं लागतो याचे भान ठेवून म्हस्के यांनी वेळोवेळी सामाजिक कामांत पुढाकार घेतला आहे. नेत्रदानासाठी ‘जागृती’ची मोलाची साथ भोसरीतील जागृती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तेजस चे नेत्रदान झाले असून, फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन म्हस्के कुटुंबीयांना आधार दिला. बिर्ला हॉस्पिटलच्या मदतीने तेजस चे नेत्र प्रत्यारोपण करण्यासाठी फाउंडेशन ने पुढाकार घेतला आहे. ४५ वे नेत्रदान असून समाजात नेत्रदानाबद्दल जनजागृती करण्याचे काम संस्था यशस्वीपणे करत आहे, असे जागृती चे अध्यक्ष राम फुगे यांनी सांगितले.तेजसच्या अपघाती निधनानंतर आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटते आहे. तरीही आपण समाजासाठी काही देणं लागतो या भावनेतून आम्ही त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. मृत्यूपश्चात तो अवयव रूपाने या जगात राहील या भावनेने आम्ही हा निर्णय घेतला. त्याच्या जाण्याने आम्ही आमचे सर्वस्वच गमावून बसलो आहे; पण त्याच्या अवयवदानामुळे कित्येक जणांना जीवदान लाभल्याने मनाला एक प्रकारचे समाधान लाभते आहे़- अमित म्हस्के, तेजसचे वडीलसामाजिक भान अधोरेखितशेती व पशुपालन करणारे म्हस्के कुटुंबीय मूळचे म्हस्के वस्ती कळस येथील रहिवाशी आहेत. सामाजिक काम करतात. त्यातच स्वत:च्या एकूलत्या एक मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेऊन त्यांनी त्यांचे सामाजिक भान अधोरेखित केले आहे.
दु:खातही एकुलत्या एक मुलाचे केले अवयवदान
By admin | Published: May 30, 2017 2:46 AM