पुणे : सुरक्षेची कोणतीही साधने न वापरल्याने काम करताना पाय घसरून इमारतीच्या डकमध्ये पडून कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी बिल्डर व ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
मरिअप्पा मल्लय्या वनकेरी (वय ३०, रा. टिळेकरनगर, कोंढवा), असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी साहेबराव मल्लय्या रामोशी (वय ४८, रा. जनता वसाहत) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार मुकुंद हनमंतराय रेड्डी आणि बिल्डर राहुल नावंदर यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगरमधील द्वारिकाधाम सोसायटीतील चालू असलेल्या इमारतीच्या साइटवर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असताना ठेकेदार व बिल्डर यांनी साइटवर कामगारांच्या जीविताची कसल्याही प्रकारची काळजी घेतली नाही. बिल्डिंगच्या बाजूने सुरक्षा रक्षक नेट बांधले नाही. त्यामुळे मरिअप्पा वनकेरी हा काम करीत असताना पाय घसरून इमारतीच्या डकमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.