बारामती: बारामतीतील निरा डावा कालव्यात दुचाकी पडल्याने झालेल्या अपघातात आजोबांसह नातीला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील पाटस रस्त्यावरील तीन मो-या नजिक हि दुर्दैवी घटना घडली. उत्तम नामदेव पाचांगणे (वय ५२,रा. बारामती ), समृद्धी विजय चव्हाण (वय १२,रा. कुरकुंभ, ता.दौंड ) अशी त्या दोघांची नाव आहेत.
रविवारी सकाळी पाचांगणे दुचाकीवरुन कुरकुंभ येथून त्यांची नातं समृध्दीसोबत बारामतीला निघाले होते. सकाळी दहाच्या सुमारास पाटस रस्त्यावरुन निरा डावा कालव्याशेजारील सातव वस्तीकडे जात होते. या ठिकाणी काही अंतरावर तीन मो-या आहेत. एका बाजूला नीरा डावा कालवा, तर दुसऱ्या बाजूला इंग्रजांच्या काळातील पूल आहे. या पूलाच्या भरावाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाचांगणे हे दुचाकी व्यवस्थित चालवत होते. दरम्यान ते शेवटच्या टोकानजिक गेल्यावर दुचाकीला सावरु शकले नाहीत. यावेळी त्यांनी पाय खाली टेकवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, दोघांसह दुचाकी कालव्यात अखेर कोसळली. याठिकाणी पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत होता. त्यामुळे दोघेही वाहून जाऊ लागले. शेवटी उत्तम यांनी समृध्दीला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत खूप प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. या घटनेत दोघांचा दुर्दैवी अंत झाला. स्थानिकांनी आजोबा आणि नातीला पाण्यातून बाहेर काढले. या घटनेमुळे पाचांगणे व चव्हाण परिवारावर शोककळा पसरली आहे.