केडगाव (पुणे) :दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्त व्यक्तींची नावे सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४४), पत्नी अदिका सुरेंद्र भालेकर (वय ३८), मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर. हे कुटुंब सोलापूर येथील असून सध्या ते दापोडी (ता. दौंड) येथे राहत आहेत.
हे कुटुंब दापोडी येथील अडसूळ यांच्या खोल्यांमध्ये राहत होते. या खोल्या पत्र्यांच्या होत्या. शेजारीच असलेल्या विजेच्या खांबाने त्याला धक्का बसला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी ७ च्या सुमारास सुरेंद्र आंघोळीला गेले होते. टॉवेल टाकत असताना अचानक विजेच्या तारेचा धक्का बसला. त्यांच्या आवाजाने तत्काळ त्यांना वाचवण्यासाठी मुलगा प्रसाद याने धाव घेतली. त्यालाही धक्का बसला त्याचवेळी पत्नी अदीका देखील तिथे आल्याने त्यांनाही विजेचा धक्का बसला.
चार जणांच्या या कुटुंबातील तीन व्यक्तींना जीव गमावा लागला. कुटुंबप्रमुखासह दोघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरेंद्र हे परिसरात बांधकामाची कामे करत होते. मुलगा केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. पत्नी गावातील शेतात मजुरीचे काम करत आहे. हे कुटुंब या परिसरात गेल्या पाच वर्षापासून राहत आहे. त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने दापोडी येथील अडसूळ यांच्या खोलीमध्ये ते राहत होते. या हृदयद्रावक घटनेने दौंड तालुक्यात दुःखाचे सावट पसरले आहे. तत्काळ विद्युत कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. पोलीस प्रशासन वेळेत दाखल झाले.
घरातील एकुलती एक मुलगी वाचली : भालेकरांच्या कुटुंबातील एकमेव मुलगी वैष्णवी कोचिंग क्लासला सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे ती घरात नव्हती. क्लासला गेल्यामुळे ही मुलगी वाचली असेही ग्रामस्थ म्हणत आहेत.