नसरापूर: भोर तालुक्यातील नसरापूर येथे दुपारी झालेल्या वादळी पावसात वीज पडून दोन लहानग्या मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी अजून एक मुलगी यातून सुदैवाने वाचली आहे. या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे या आदिवासी कातकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आज दुपारी साडे तीनच्या दरम्यान घरा शेजारील डोंगरालगत मोठ्या खडकापाशी तीन मुली खेळत असताना ही घटना घडली आहे. त्यामध्ये सीमा अरुण हिलम(वय ११) व अनिता सिंकदर मोरे (वय ९, दोघी रा.चेलाडी, नसरापूर) या दोन लहान मुलींचा मृत्यू झाला. तर यातून चांदणी प्रकाश जाधव (वय ९ ) ही मुलगी यातून सुदैवाने बचावली आहे.
डोंगरालगत खेळत असताना अचानक आलेल्या पावसात विजेचा कडकडाट झाला. यामध्ये तीन मुलींपैकी दोन मुली घटना स्थळी वीज पडल्याने भाजून निघाल्या तर एक मुलगी बेशुद्ध झाली होती. यातूनही त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी तातडीने वेळ न घालवता नसरापूर येथील सिद्धीविनायक रुग्णालयात उपचारासाठी तिन्ही मुलींना दाखल केले होते. दरम्यान यापैकी सीमा व अनिता या दोन मुली उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉ.जगदीश फराटे यांनी सांगितले.
यावेळी मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जालिंदर बरकडे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसारे, उपनिरीक्षक राहुल साबळे व प्रमोद भोसले यांनी या दुर्दैवी घटनेची पाहणी करून पंचनामा केला. मृत झालेल्या मुलीच्या कुटुंबांना तातडीने शासकीय आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.